आपच्या नेत्या आतिशी यांचे पाणीबाणीवरून बेमुदत उपोषण
Updated On:

नवी दिल्ली : दिल्लीच्या मंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी पाणीबाणीवरून शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. हरियाणातून अधिक पाणी उपलब्ध होण्याच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. देशाची राजधानी दिल्लीला मागील काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दिल्लीतील वातावरण आणि राजकारणही तापले आहे.
जल विभागाच्या मंत्री असणाऱ्या आतिशी यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले. दिल्लीला २१ जूनपर्यंत पाणी मिळाले नाही तर उपोषण सुरू करण्याचा इशारा त्या पत्रातून देण्यात आला. आता दिलेल्या इशाऱ्यानुसार आतिशी यांनी उपोषण सुरू केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता आणि आपच्या नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी आंदोलनाचा प्रारंभ केला.





