दिल्लीत ‘आप’चा पराभव, अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, भाजपचे अभिनंदन करत म्हणाले…

Arvind Kejriwal On Delhi Election Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. सध्या भाजप जवळपास 45 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. आप 20 पेक्षा अधिक जागांवर पुढे आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला अद्याप खाते उघडता आलेले नाही.
या निवडणुकीत आपच्या अनेक प्रमुख नेत्यांचा पराभव झाला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदीया यांचा पराभव झाला आहे. आता या पराभवानंतर केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘हार स्विकारत विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडू’, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
केजरीवाल यांनी सोशल मीडियावर कार्यकर्त्यांसाठी एक व्हीडिओ मेसेज शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये केजरीवाल म्हणाले की, ‘जनतेने जो निर्णय दिला आहे त्याचा आम्ही नम्रतेने स्विकार करतो. या विजयासाठी भारतीय जनता पार्टीला शुभेच्छा. आशा आहे की नागरिकांनी ज्या अपेक्षेने त्यांना बहुमत दिले आहे, त्या सर्व अपेक्षा ते पूर्ण करतील.’
दिल्ली चुनाव के नतीज़ों पर AAP के राष्ट्रीय संयोजक @ArvindKejriwal जी का संदेश pic.twitter.com/BKyCnkSQtc
— AAP (@AamAadmiParty) February 8, 2025
‘मागील 10 वर्ष जनतेने आम्हाला जी संधी दिली, त्या 10 वर्षात आम्ही अनेक कामे केली. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज अशा विविध क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम केले. दिल्लीतील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे काम देखील केले. जनतेने जो निर्णय दिला आहे, त्याद्वारे आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडू. तसेच, समाजसेवा, लोकांची मदत करणे असो आम्ही नेहमी त्यांची मदत करत राहू.’, असे पराभवावर बोलताना ते म्हणाले.
आम्ही राजकारणात सत्तेसाठी आलेलो नाही. आम्ही राजकारणाला जनतेच्या सेवेचा एक मार्ग मानतो. मी आपच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो की, त्यांनी खूप चांगली निवडणूक लढवली. त्यांनी खूप मेहनत घेतली, खूप काही सहन केले, असेही केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल पराभूत झाले आहेत. त्यांचा भाजपचे परवेश वर्मा यांनी त्यांचा 3186 मतांनी पराभव केला आहे. जंगपुरा मतदारसंघातून आप नेते व दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा देखील पराभव झाला आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी येथून निवडणूक जिंकली आहे. त्यांनी निवडणुकीत भाजपचे रमेश बिधुरी यांचा पराभव केला आहे.




