Sandeep Dikshit : आप 7 ते 8 जागाच जिंकू शकेल; कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी वर्तवले भाकीत

नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप पराभूत होईल. तो पक्ष एकूण 70 पैकी अवघ्या 7 ते 8 जागाच जिंकू शकेल, असे भाकीत कॉंग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी केले. त्यातून त्यांनी दिल्लीत खरी लढत कॉंग्रेस आणि भाजपमध्येच होणार असल्याचे सूचित केले.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांचे पुत्र असणाऱ्या संदीप यांना कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांची लढत थेट आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याशी होईल. त्यामुळे लक्षवेधी उमेदवारांमध्ये समावेश झालेल्या संदीप यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. सत्ताधारी आपला गैरकृत्यांमुळे पराभव पत्करावा लागेल.
आप जेवढे कार्य केल्याचा दावा करतो; प्रत्यक्षात त्या दावाच्या 10 टक्के इतकेही कार्य झालेले नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच, कॉंग्रेससाठी वातावरण चांगले असल्याची पुस्तीही जोडली. कॉंग्रेसने दिल्लीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्याविषयीच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी कॉंग्रेसमध्ये कधीच तशी व्यवस्था केली जात नसल्याकडे लक्ष वेधले.





