‘बालिश राजकीय स्पर्धेला बाजूला ठेवून….’ नववर्षाआधी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली ‘ही’ मागणी

Aaditya Thackeray letter to CM Devendra Fadnavis: निवडणुका असो अथवा एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस, चौकाचौकात शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकलेले पाहायला मिळतात. बहुतांशवेळा कोणतीही परवानगी न घेता संपूर्ण शहरात अशाप्रकारचे बॅनर्स लावले जातात. बॅनर्स पडून अपघात झालेल्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित राज्यभरात राजकीय पोस्टर, बॅनर्स व होर्डिंग्सवर प्रतिबंध लावावा, अशी मागणी केली आहे.
सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आपल्या शहरांमध्ये राजकीय होर्डिंग लावण्याचे टाळावे, असे आवाहन करणारे पत्र आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना लिहिले आहे. सोबतच, ‘नो बॅनर’ उपक्रमासाठी पाऊल उचलले, तर आम्ही देखील त्यांना साथ देऊ आणि त्याचे काटेकोरपणे पालन करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आपल्या शहरांमध्ये राजकीय होर्डिंग लावण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यास मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.
फडणवीस जी ह्यांनी ‘नो बॅनर’ उपक्रमासाठी पाऊल उचलले, तर आम्ही देखील त्यांना साथ देऊ आणि त्याचे… pic.twitter.com/oU8vKZdgmM— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 24, 2024
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“आपण 2025 मध्ये पदार्पण करताना तसेच, लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून; नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ शकता.
गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या राजकीय गोंधळामुळे, प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात हजारो राजकीय पोस्टर (कायदेशीर आणि बेकायदेशीर) पाहायला मिळत आहेत. एक नागरिक म्हणून हे पाहून खेद वाटतो आणि एक व्यक्ती म्हणून शहर विद्रुप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा त्रास होतो. गेल्या दोन वर्षांत बीएमसीकडून निवडक पोस्टर हटवण्यात आली, तर सत्ताधारी पक्षाचे पोस्टर मात्र तसेच दिसत आहेत.”
“आपण या बालिश राजकीय स्पर्धेला बाजूला ठेवून, सर्व राजकीय पक्षांनी बेकायदेशीर पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग्ज न लावण्याचा निर्णय घेतला, तर नागरिकांना आपण मोठा दिलासा देऊ शकतो. ह्यामुळे आपली शहरे स्वच्छ दिसतीलच, शिवाय आपल्या कार्यकर्त्यांनाही अशा खर्चातून दिलासा मिळेल”
जगात कुठेही असे राजकीय पोस्टर लावले जात नाहीत. त्यामुळे, मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्यादिशेने पहिले पाऊल टाका, आम्हीही तुमच्या पाठीशी आहोत. आपण सत्तेत मुख्यमंत्री आणि आम्ही, विरोधी पक्ष म्हणून असलो तरी ह्या गोष्टींवर आपण एकत्र काम केलेच पाहिजे. आपण ह्या विषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले, तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या या पत्रानंतर मुख्यमंत्री राजकीय बॅनर्स व हॉर्डिंग्स लावण्यावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





