Aaditya Thackeray : “महायुतीची सत्ता आल्यास ‘त्या’ प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार”; शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंना थेट इशारा

Disha Salian death case | Aaditya Thackeray | Ramdas Kadam : बॉलीवूड इंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर ‘दिशा सालियन’ मृत्यूप्रकरणाचा पुन्हा एकदा उल्लेख करत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंना इशारा दिला आहे.
‘पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतील’ असा थेट इशारच त्यांनी दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी दापोलीत घेतलेल्या सभेमध्ये सडकून टीका केल्यानंतर रामदास कदम यांनी आता आदित्य ठाकरेंवर पलटवार केल्याचं दिसून आलं आहे.
दापोलीमधील सभेत आदित्य ठाकरेंनी थेट कोणाचाही उल्लेख न करता, इथेही एक गद्दार आहे. तो दादागिरी करतो, रडतो असं म्हणत अप्रत्यक्षपणे रामदास कदमांवर निशाणा साधला होता. आदित्य ठाकरेंची ही टीका रामदास कदमांच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे.
त्यामुळे आता रामदास कदम यांनी ठाकरेंच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रामदास कदम म्हणाले की, “दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेचे नाव होते. आमची सत्ता आल्यावर त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही,” असं त्यांनी म्हंटलं आहे.
तसेच पुढे बोलातना त्यांनी आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख देखील केल्याचं दिसून आलं, “आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता घराबाहेर जाऊन सकाळी पाच वाजता येतो. याचे रात्रीचे धंदे महाराष्ट्राच्या समोर यायला पाहिजेत, आपली औकात बघून आदित्यने बोलावं” असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
‘दिशा सालियन’ प्रकरण काय आहे?
मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती.
या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते.
दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेदेखील आत्महत्या केली होती. या दोन्ही आत्महत्या संशयास्पद असल्याचे सांगत तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते.





