पुणे | दस्तांवरील आधार क्रमांक, अंगठ्याचे ठसे गोपनीय

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “ई-सर्च’मधून उपलब्ध होणाऱ्या खरेदी-विक्रीच्या दस्तांच्या प्रतींमधील पक्षकारांचे आधार क्रमांक व अंगठ्याचे ठसे गोपनीय ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. त्यानुसार जुलै 2023 पासूनच्या दस्तांना ही सुविधा लागू करण्यात आली आहे. मात्र, जुलै 2023 च्या पूर्वीचे दस्त हे पीडीएफऐवजी “आय-सरिता’ प्रणालीमध्ये साठवून ठेवण्यात आले आहेत.
त्यामुळे जुलै 2023 पूर्वीचे दस्त डाऊनलोड केल्यानंतर त्यावरील आधार क्रमांक व अंगठ्याचे ठसे गोपनीय ठेवण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्र अर्थात “एनआयसी’च्या मदतीने संगणक प्रणाली तयार करण्यात येत आहे. त्यानंतर “ई-सर्च’मधून जुलै 2023 पूर्वीचे दस्त डाऊनलोड केल्यानंतर त्यातील गोषवारा भाग-2 वर, पक्षकारांचे फोटो आणि स्वाक्षरी इतकेच दिसणार आहे. त्यांचे अंगठ्याचे ठसे येथे केवळ “बरोबर’ अशी खूण दिसणार आहे.
भाडेकरार अथवा खरेदी-विक्री दस्तांवरील नागरिकांची माहिती गोपनीय ठेवण्यास नोंदणी विभागाने प्राधान्य दिले आहे. नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावरून भाडेकरार अथवा सदनिका, दुकाने, जमीन आदी खरेदी-विक्री व्यवहारांचे दस्त डाऊनलोड करता येतात.
दस्तांच्या प्रती डाऊनलोड करण्यासाठी नोंदणी विभाग शुल्क आकारते. ई सर्च”ई-सर्च’मधून हे दस्त उपलब्ध होतात. यापूर्वी “ई-सर्च’मधून उपलब्ध होणाऱ्या दस्तांच्या प्रतींमध्ये आधार क्रमांक व अंगठ्याचे ठसे दिसत होते.
यातून कोणतेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात “यूआयडीएआय’ने नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी पक्षकारांचे अंगठ्याचे ठसे सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नोंदणी विभागाने दि. 6 जुलै 2023 पासून याची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
मात्र, जुलै 2023 पूर्वीचे दस्तांमधील ही माहिती गोपनीय ठेवण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. जुलै 2023 पूर्वीचे दस्त हे “पीडीएफ’ऐवजी “आय-सरिता’ प्रणालीमध्ये वेगळ्या फाॅरमॅटमध्ये जतन केले जातात. त्यामुळे जुन्या दस्तांना ही सुविधा देण्यास वेळ लागत आहे. या संदर्भात आवश्यक बदल करण्याच्या सूचना नोंदणी विभागाने “एनआयसी’ला दिल्या आहेत.
नागरिकांची माहिती गोपनीय
“ई-सर्च’वर मुंबई शहरातील सन 1985 पासूनचे दस्त उपलब्ध आहेत. तर, उर्वरित राज्यातील 1998 पासूनचे दस्त या प्रणालीत उपलब्ध आहेत. त्यामुळे या काळातील दस्त “ई-सर्च’वरून डाऊनलोड केल्यानंतर त्यावरील आधार क्रमांक व अंगठ्याचे ठसे गोपनीय राहणार आहेत.
अंगठ्याचे ठसे हे नोंदणी विभागाच्या सर्व्हरवर जतन केले जाणार आहेत. ते ठसे सामान्य व्यक्तींना दिसणार नाहीत. त्यामुळे आधार क्रमांक व अंगठ्याचे ठसे वापरून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल. तसेच नागरिकांची माहिती गोपनीय राहील, अशी माहिती नोंदणी विभागातील अधिकार्यांनी दिली.





