Aadhaar Center Mulshi: मुळशीत आधार केंद्रेच झाली निराधार! २० पैकी ७ आधार केंद्रे कागदावरच; प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
Aadhaar Center Mulshi: मुळशी तालुक्यात २० पैकी केवळ १३ आधार केंद्रे सुरू; उर्वरित ७ केंद्रांवर अडचणींचे सावट अन् नागरिकांचे हाल.

Aadhaar Center Mulshi – मुळशी तालुक्यात नागरिकांच्या आधारविषयक अडचणी सोडविण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 20 आधार सेवा केंद्रांपैकी तब्बल 7 केंद्रे प्रत्यक्षात कार्यरत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही केंद्रे मंजूर ठिकाणी सुरू नसून अन्यत्र सुरू असल्याचे आढळले आहे, तर पोमगाव आणि मुठा येथील केंद्रे नेमकी कुठे सुरू आहेत, याची माहिती प्रशासनाकडेच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे आधार सेवा केंद्रांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वराज्य पक्षाचे मुळशी तालुका प्रमुख राजू फाले यांनी याबाबत तहसीलदारांकडे अर्ज करून माहिती मागविली होती. त्यानंतर तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी 5 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या लेखी उत्तरातून तालुक्यातील आधार केंद्रांच्या सद्यस्थितीची माहिती समोर आली. तालुक्यात मंजूर असलेल्या 20 केंद्रांपैकी केवळ 13 केंद्रे सुरळीतपणे सुरू आहेत.
उर्वरित सात केंद्रांमध्ये विविध प्रकारच्या अडचणी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. काही ठिकाणी केंद्र मंजूर असूनही ते सुरू झालेले नाही, काही ठिकाणी यंत्रणा उपलब्ध असून ऑपरेटर नसल्याने सेवा बंद आहे, तर काही केंद्रे मंजूर ठिकाणाऐवजी अन्यत्र सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. पौड येथील आधार केंद्रातील यंत्रणा ऑपरेटर उपलब्ध नसल्याने बंद आहे.
सावरगाव येथे आधार केंद्राला मंजुरी असली तरी तेथे केंद्र सुरू नसून मंजूर ठिकाणाव्यतिरिक्त अन्यत्र आधार केंद्र सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. कोळवण आणि घोटावडे येथील मंजूर केंद्रे अद्याप सुरू झालेली नाहीत. पोमगाव आणि मुठा येथील आधार केंद्रे मंजूर ठिकाणी सुरू नसून ती अन्य कोणत्या ठिकाणी सुरू आहेत, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची बाब विशेष गंभीर मानली जात आहे.
तसेच उपविभागीय अधिकारी, मावळ-मुळशी यांच्याकडील आधार यंत्रणा पूर्वी कार्यरत होती; मात्र सध्या ऑपरेटर उपलब्ध नसल्याने तीही बंद असल्याचे समोर आले आहे. आधार सेवा केंद्रांची संख्या कागदावर मोठी असली तरी प्रत्यक्षात सेवा उपलब्ध नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘केंद्रांच्या कारभाराची पोलखोल करणार’
या प्रश्नावर 15 सप्टेंबर 2025 पासून पाठपुरावा करत आहे. 5 ऑगस्ट 2026 रोजी तहसीलदारांनी आधार केंद्रांबाबत मला पत्र दिले आहे. मुळशी तालुक्यात आधार सेवा केंद्रे केवळ कागदावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या ठिकाणी अधिकृत केंद्रांना मंजुरी आहे, तेथे यंत्रे का नाहीत आणि ती अन्यत्र कुठे वापरली जात आहेत, याची लवकरच पोलखोल करणार आहे, असा इशारा स्वराज्य पक्षाचे मुळशी तालुका प्रमुख राजू फाले यांनी दिला आहे.






