पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण कारवाई प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिकेकडून अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग आणि आकाशचिन्ह विभाग एकत्रित कारवाई करणार आहे. त्यासाठी १५ जुलै ते २७ जुलैपर्यंतचे वेळापत्रक प्रशासनाने तयार केले असून, कोणत्या भागात, कोणत्या दिवशी आणि किती वाजता कारवाई करायची, याची माहिती आहे. हे वेळापत्रक संबधित विभागांसह , उपअभियंते आणि कनिष्ट अभियंत्यांना पाठविण्यात आले असून, हे वेळापत्रक व्हायरल झाले आहे. त्यामुळे आपल्यावर कारवाई होणार याची माहिती आधीच मिळल्याने अनेकांनी अतिक्रमणे तात्पुरत्या स्वरूपात काढून घेण्यासही सुरूवात केली असून, अनेकांकडून दबाव आणण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे कारवाई करायची होती, तर गुपचूप नियोजन करता आले नसते का, असा सवाल उपस्थित होत आहे. शहरातील नो हाॅकर्स झोन म्हणून घोषित रस्त्यांवर, तसेच ज्या ठिकाणी फ्रंटमार्जिनमध्ये अतिक्रमणे आहेत, तिथे पालिकेने कारवाईस सुरुवात केली आहे. ही कारवाई अधिक प्रभावी व्हावी, यासाठी तीन विभाग एकत्रित कारवाई करणार आहेत. त्याचे वेळापत्रक तयार करून देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी मागील आठवड्यात दिले होते. त्यानुसार, त्याचे वेळापत्रक तयार करून ते सर्वांना पाठवले आहे. मात्र, ते व्हायरल झाल्याने अनेकांनी तात्पुरती अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, ही कारवाई खरेच प्रभावी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना टिप? शहरातील व्यावसायिक दुकानांनी फ्रंट मार्जिनमध्ये केलेली अतिक्रमणे आणि सार्वजनिक रस्त्यांवर थाटलेल्या पथारींमुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. अतिक्रमण पथक कारवाईस निघाले, की पथकातील काही कर्मचारीच या विक्रेत्यांना टिप देतात. परिणामी पथक पोहचण्याआधीच अतिक्रमणे करणारे गायब असतात. त्यातच आता पालिकेचे दोन आठवड्यांचे वेळापत्रकच व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.