Pune | भरधाव पीएमपीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे, – विवाह सोहळा आटोपून घरी परतणाऱ्या आजी आणि नातीला भरधाव पीएमपीने उडवले. यामध्ये आजीचा जागीच मृत्यू झाला, तर नात गंभीर जखमी झाली. ही घटना पुणे-सातारा रस्त्यावरील नातूबाग येथे घडली. या प्रकरणी पीएमपी चालकावर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशाबाई दत्तात्रय साळुंके (५७, रा. टिळक रोड) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा विशाल याने दिलेल्या तक्रारीवरुन सतीश राजाराम गोरे (३४, रा. कोंढणपूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला.
साळुंखे कुटूंब एका विवाह सोहळ्यासाठी नातुबाग येथे आले होेते. विवाह आटोपून आशाबाई आणि फिर्यादी यांची मुलगी बालाजीनगर येथे जाण्यासाठी रिक्षा पकडायला रस्ता ओलांडत होत्या. यावेळी कात्रज ते स्वारगेटच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या पीएमपी बसने त्यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आशाबाई यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक फिरोज शेख करत आहेत.





