Vinay Apte : कलाकार घडवणारा अवलिया माणूस! विनय आपटे यांनी अनेकांचं नशीब असं बदललं, थेट फोन करून सांगायचे….
Vinay Apte : विद्यार्थीदशेत असतानाच 'मॅन विदाऊट शॅडो' या नाटकातून त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले.

Vinay Apte : मनोरंजन विश्वात एखादा चित्रपट किंवा एखादी भूमिका कलाकाराच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते. एका संधीमुळे कलाकाराच्या करिअरला नवी दिशा मिळते आणि त्यानंतर त्याला कधीच मागे वळून पाहावे लागत नाही. त्यामुळेच प्रत्येक कलाकाराला आपल्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे, अशी अपेक्षा असते. मराठी मनोरंजन विश्वात स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवतानाच अनेक नवोदित कलाकारांना संधी देण्याचे काम दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते विनय आपटे यांनी केले.
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. आज प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अनेक कलाकारांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात विनय आपटे यांनी संधी दिली होती. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच वयाच्या अवघ्या 63 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
‘मॅन विदाऊट शॅडो’ मधून मराठी रंगभूमीवर पदार्पण
विनय आपटे यांना लाभलेला भारदस्त आवाज त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मोठी ओळख होती. त्यांच्या आवाजातील वजन आणि अभिनयातील सहजता प्रेक्षकांना विशेष भावायची. नाटक हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. सुरुवातीच्या काळात अनेक नाटकांमध्ये काम करत त्यांनी आपल्या जिवंत अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.
विद्यार्थीदशेत असतानाच ‘मॅन विदाऊट शॅडो’ या नाटकातून त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर ‘गणरंग’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध कलाकृतींची निर्मिती केली. मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. ‘नाटक’, ‘गजरा’, ‘युवावाणी’ यांसारख्या दर्जेदार कार्यक्रमांच्या निर्मितीतही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
विनय आपटे यांनी केवळ स्वतःचे करिअर घडवले नाही, तर अनेक कलाकारांना मनोरंजन विश्वात पहिली संधी मिळवून दिली. अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे आणि सुकन्या कुलकर्णी यांसारख्या कलाकारांना त्यांनी संधी दिल्याचे सांगितले जाते.
उपेंद्र लिमयेंनी सांगितला किस्सा
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता उपेंद्र लिमये यांनीही विनय आपटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विनय आपटे यांच्या स्वभावाबद्दल आणि मराठी कलाकारांना पुढे आणण्यासाठी त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांबद्दल उपेंद्र लिमये यांनी भरभरून सांगितले. एका चित्रपटाच्या संदर्भात विनय आपटेंनी थेट दिग्दर्शकाला फोन करून माझं नाव सुचवलं आणि तुझ्याकडे पाठवतोय असं त्या दिग्दर्शकाला सांगितलं. विनय आपटे यांच्यामुळे आपल्या करिअरला मोठी कलाटणी मिळाल्याचे अभिनेत्याने आवर्जून नमूद केले.
दुर्वा मालिका ठरली शेवटची
नाटकांच्या क्षेत्रातही विनय आपटे यांचे योगदान मोठं आहे. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या चर्चित आणि वादग्रस्त नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या अनेक नाटकांमध्येही त्यांनी अभिनय केला. छोट्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘दुर्वा’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली.
वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाने, भारदस्त आवाजाने आणि प्रभावी अभिनयाने विनय आपटे यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी केवळ उत्तम कलाकार म्हणूनच नव्हे, तर नव्या कलाकारांना घडवणारे मार्गदर्शक म्हणूनही आपली ओळख निर्माण केली. ७ डिसेंबर २०१३ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी विनय आपटेंनी जगाचा अखेरचा निरोप घेतला.
Sardaar Ji 3 OTT Release: भारतामधील रिलीज रद्द, आता OTT वर एन्ट्री; ‘सरदार जी 3’ पुन्हा चर्चेत





