Body Autonomy: लपवून ठेवले जाणारे अंडरआर्मचे केस आता रंगवून दाखवण्याचा ट्रेंड! Gen Z चा Body Autonomy चा नेमका अर्थ काय?
Body Autonomy चीनमध्ये हा ट्रेंड पुन्हा चर्चेत आला आहे. रंगवलेल्या अंडरआर्मच्या केसांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. मात्र, या ट्रेंडमागे नेमकी काय भूमिका आहे? महिलांच्या सौंदर्याविषयीच्या ठरावीक कल्पनांना यातून कसे आव्हान दिले जात आहे? जाणून घेऊया.

Body Autonomy: सौंदर्याच्या ठरावीक कल्पनांना आव्हान देणारे अनेक ट्रेंड सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यामध्ये आता अंडरआर्मचे केस गुलाबी, निळ्या किंवा इतर आकर्षक रंगांत रंगवण्याच्या ट्रेंडची भर पडली आहे. पहिल्यांदा ऐकल्यावर हा प्रकार काहींना विचित्र वाटू शकतो. मात्र, Gen Z मधील काही तरुणींसाठी हा केवळ फॅशनचा प्रकार नसून, शरीराविषयीची लाज बाजूला ठेवून स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा प्रयत्न आहे.
चीनमध्ये हा ट्रेंड पुन्हा चर्चेत आला आहे. रंगवलेल्या अंडरआर्मच्या केसांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. मात्र, या ट्रेंडमागे नेमकी काय भूमिका आहे? महिलांच्या सौंदर्याविषयीच्या ठरावीक कल्पनांना यातून कसे आव्हान दिले जात आहे? जाणून घेऊया.
चीनमध्ये चर्चेत, पण सुरुवात अमेरिकेत झाली!
अंडरआर्मचे केस रंगवण्याचा ट्रेंड चीनमधून सुरू झालेला नाही. २०१४ मध्ये अमेरिकेतील सिएटल येथील हेअर स्टायलिस्ट रॉक्सी हंट यांनी आपल्या सहकाऱीचे अंडरआर्मचे केस निळ्या रंगात रंगवले होते. त्यानंतर त्यांनी या प्रयोगाचे फोटो ऑनलाइन शेअर केले. पाहता पाहता या प्रकाराची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.
पुढे ‘Dyed Pits’ या हॅशटॅगसह रंगवलेल्या अंडरआर्मच्या केसांचे फोटो शेअर होऊ लागले. याआधी २०११ मध्ये प्रसिद्ध गायिका लेडी गागा यांनीही हिरव्या रंगाच्या अंडरआर्मच्या केसांमुळे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे शरीरावरील केसांविषयीच्या पारंपरिक कल्पनांवर चर्चा होण्यास मदत झाली.
लपवण्याऐवजी दाखवण्याचा निर्णय का?
लहानपणापासूनच अनेक मुलींना शरीरावरील केस काढण्याची सवय लावली जाते. विशेषतः अंडरआर्मचे केस दिसणे म्हणजे अस्वच्छता किंवा सौंदर्याचा अभाव, अशी समजूत अनेकदा समाजात पाहायला मिळते. स्लीव्हलेस कपडे घालताना केस दिसू नयेत, यासाठी काही मुली वैक्सिंग किंवा शेव्हिंग करतात.
मात्र, Gen Z मधील काही तरुणी या विचारांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. शरीरावर केस असणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, मग ते लपवण्याची सक्ती का असावी, असा त्यांचा सवाल आहे. काही तरुणी हे केस रंगवून सोशल मीडियावर दाखवत आहेत. यातून शरीराविषयीची लाज न बाळगता स्वतःच्या आवडीनुसार व्यक्त होण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Body Autonomy
सौंदर्याचे नियम कोण ठरवणार?
महिलांनी कसे दिसावे, कोणते कपडे घालावेत आणि शरीराची काळजी कशी घ्यावी, याबाबत समाजात अनेक अपेक्षा असतात. गुळगुळीत त्वचा आणि केस नसलेले अंडरआर्म म्हणजेच सुंदर दिसणे, अशी कल्पना अनेक वर्षांपासून रुजलेली आहे.
अशा वेळी अंडरआर्मचे केस रंगवण्याचा ट्रेंड या कल्पनेला आव्हान देतो. प्रत्येकाने एकाच प्रकारे सुंदर दिसले पाहिजे का? स्वतःच्या शरीराविषयीचे निर्णय घेण्याचा अधिकार व्यक्तीला नाही का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.
याच विचाराला ‘बॉडी ऑटोनॉमी’ (Body Autonomy) असे म्हटले जाते. म्हणजेच स्वतःच्या शरीराशी संबंधित निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार. केस काढायचे की नाही, त्यांना रंग द्यायचा की नाही, याचा निर्णय व्यक्तीने स्वतःच्या इच्छेनुसार घ्यावा, ही त्यामागची मुख्य भूमिका आहे.
भारतातही बॉडी पॉझिटिव्हिटीची चर्चा
भारतातही महिलांच्या सौंदर्याविषयीच्या अपेक्षा आणि शरीराविषयीच्या संकोचावर चर्चा वाढत आहे. सण-समारंभ, पार्टी किंवा इतर कार्यक्रमांमध्ये स्लीव्हलेस कपडे घालताना काही मुलींना अंडरआर्मचे केस दिसण्याची चिंता वाटते. त्यामागे स्वतःची पसंती असू शकते, तर काही वेळा कुटुंबीयांच्या किंवा समाजाच्या प्रतिक्रियांची भीतीही असू शकते.
सोशल मीडियामुळे वेगवेगळ्या त्वचेचे रंग, शरीराची ठेवण आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये असलेल्या व्यक्तींना स्वतःला व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे सौंदर्याच्या ठरावीक निकषांबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.
ट्रेंड स्वीकारणे बंधनकारक नाही!
अंडरआर्मचे केस रंगवण्याचा ट्रेंड कोणाला आवडू शकतो, तर कोणाला तो आवडणारही नाही. दोन्ही प्रतिक्रिया स्वाभाविक आहेत. मात्र, बॉडी पॉझिटिव्हिटीचा अर्थ प्रत्येकाने केस वाढवावेत किंवा वैक्सिंग-शेव्हिंग बंद करावे, असा नाही. एखाद्या व्यक्तीला केस काढायचे असतील, तर तोही तिचा निर्णय आहे. त्याचप्रमाणे केस नैसर्गिक ठेवायचे असतील किंवा त्यांना रंग द्यायचा असेल, तरी तो तिचाच निर्णय असायला हवा.
शेवटी, सौंदर्य म्हणजे केवळ ठरावीक निकषांमध्ये बसणे नव्हे. स्वतःच्या शरीराविषयी सहजता बाळगणे, स्वतःच्या आवडीचा आदर करणे आणि इतरांच्या निवडीचा सन्मान करणे, हाच या ट्रेंडमधून समोर येणारा महत्त्वाचा विचार आहे.



