केनियातील शाळेला भीषण आग, तब्बल ‘इतक्या’ शाळकरी विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

नैरोबी – केनियातल्या एका निवासी शाळेला लागलेल्या भीषण आगीमध्ये होरपळून १७ शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य १३ मुले गंभीरपणे भाजली आहेत, असे पोलिसांनी सांगितले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
न्येरी कौंटीतील हिलसाइड एन्डरशा प्राथमिक शाळेला मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही आग लागली. आग लागण्याची कारणे शोधली जात आहेत, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.
या निवासी शाळेमध्ये १४ वर्षांपर्यंतची मुले असतात आणि निवासी कक्षात १५० पेक्षा जास्त मुले होती, असे न्येरी कौंटीचे आयुक्त आणि शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. संपूर्ण इमारत लाकडाच्या फळ्यांनी बांधली गेली असल्याने आग वेगाने भडकली.
संपूर्ण शाळेमध्ये ८२४ पेक्षा जास्त मुले असून ही शाळा राजधानी नैरोबीच्या उत्तरेला२०० किलोमीटर अंतरावर देशाच्या मध्यभागातल्या उंचावरच्या पठारावर आहे. या भागात बंधकामांसाठी लाकडाच्या फळ्यांचा वापर सर्रास केला जातो.
आगीमध्ये होरपळलेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह ओळखण्यापलिकडे जळून गेले आहेत. मुलांचे पालक देखील आपल्या मुलांचे मृतदेह ओळखू शकले नाहीत. ही घटना अतिशय धक्कादायक असल्याचे कनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांनी म्हटले आहे.
या घटनेचा सविस्तर तपास करण्याचे आदेश आपण प्रसासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेला कारणीभूत असलेल्यांना जबाबदार धरले जाईल, असेही त्यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
निवासी शाळांसाठी शिक्षण मंत्रालयाने सुरक्षा विषयक ज्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केनियाचे उपाध्यक्ष रिगिथी गाचागुआ यांनी शाळांच्या व्यवस्थापनांना केले आहे.
केनियामध्ये निवासी शाळांना आग लागण्याच्या घटना नेहमी होत असतात. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांकडून अनेकवेळा अशा शाळांना आग लावली जात असते. मुलांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी मुलांना निवासी शाळांमध्ये ठेवण्याकडे पालकांचा अधिक कल असतो.
शाळांमध्ये कराव्या लागणाऱ्या कामाच्या अतिरिक्त ताणामुळे आणि शाळांमधील खालावलेल्या राहणीमानामुळे मुलांनीच शाळा पेटवून दिल्याचीही काही उदाहरणे समोर आली आहेत.
२०१७ साली विद्यार्थ्यांनीच शाळेला लावलेल्या आगीमध्ये १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर २००१ मध्ये मचाकोस कौंटीतील निवासी शाळेला लागलेल्या आगीमध्ये ६७ विद्यार्थ्यांचा होरपळून मृतूय झाला होता.





