पिंपरी | एक्स्प्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात

खालापूर, (वार्ताहर) – मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवरून मुंबईकडे निघालेल्या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटून समोरील कोंबड्यांनी भरलेल्या टेम्पोला व कारला धडक दिली. शुक्रवारी (दि. 10) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आडोशी बोगद्या दरम्यान किलोमीटर 38/200 जवळ झालेल्या या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. या तीनही वाहनांची मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक (क्रमांक KA-56-3277) कि.मी. 38/200 जवळ आला असताना ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून ट्रक पुढे चालणाऱ्या कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पो (क्रमांक MH-03-CP-2428) व ओमनी (क्रमांक MH-11-Y- 7832) या वाहनांना जोरात धडक दिली.
या भीषण अपघातात ओमनी कार मधील 2 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे तर 3 जण जखमी झाले आहेत. कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पो मधील 2 जण गंभीर तर 2 जण किरकोळ जखमी आहेत. ट्रक मधील एकाचा मृत्यू तर, 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर एमजीएम रुग्णालय हालविण्यात आले.
अपघाताची माहिती समजताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी कडील देवदूत टिम, आयआरबी पेट्रोलींग टिम, मृत्यूंजय दूत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, लोकमान्य हॉस्पिटल अँम्बुलन्स सेवा, महाराष्ट्र शासनाची 108 अँम्बुलन्स सेवा यांनी मदतकार्य केले. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मदत यंत्रणेने व पोलीस यंत्रणा यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत काही वेळानंतर ही वाहतूक सुरळीत सुरू केली.





