Pune | मेंढपाळांच्या सुरक्षेसाठी तंबूचे कवच

पुणे ,- जुन्नर वनविभागात बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता बिबट्यापासून मेंढ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी मेंढपाळांना वनविभागातर्फे तंबूचे कवच देण्यात आले आहे. नागरिकांच्या संरक्षणासाठी घर-गोठ्यांभोवती सौरकुंपण, नेक बेल्ट आदी अनेक उपाययोजना वन विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून उघड्यावर झोपणाऱ्या मेंढपाळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असल्याने जुन्नर येथील उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी तंबूची संकल्पना अंमलात आणली.
वन विभागाने जुन्नर वनविभागाने शासकीय निधीतून मेंढपाळांना राहण्यासाठी तंबू खरेदी करून त्याचे वाटप सुरू आहे. सुरुवातीला ८५ तंबू उपलब्ध झाले असून, लवकरच उर्वरित तंबू खरेदी केले जातील आणि ते मेंढपाळांना दिले जातील, असे सातपुते यांनी सांगितले.
तंबूमुळे बिबट्याचा हल्ला, सर्पदंश तसेच पाऊस आणि थंडी यापासून मेंढपाळांचे संरक्षण होण्यासाठी मदत होईल, असे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले. शिरोली बुद्रुक, आगर, नेतवड, ओझर, तेजेवाडी येथील वास्तव्यास १५ मेंढपाळांना तंबूचे वाटप सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
तंबू कसा लावावा आणि तो जास्तीत जास्त कसा टिकेल, याचे प्रात्यक्षिक धामणखेल येथील वनरक्षक रमेश खरमाळे, जुन्नर येथील वनपाल नितीन विधाटे आणि जुन्नर येथील वनरक्षक देविदास मिसाळ यांनी करून दाखवले. या वेळी नारायणगाव येथील वनपाल अनिता होले, ओक्षर येथील वनरक्षक महेश बगाड, रेस्क्यू टीम मेंबर, विकास मोरे, धोंडीभाऊ मोरे, विजय मोरे, अजित मोरे, तुषार मोरे, तसेच ग्रामस्थ, खंडू मोरे, रमेश मोरे, किसन जाधव आदी उपस्थित होते.




