पुण्यातील टीमतर्फे धुळ्यातील बिबट्याचा शोध

पुणे – धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या तीन दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटनांमध्ये दोन अल्पवयीनांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. धुळे वन अधिकाऱ्यांनी या घटनांमध्ये एकाच बिबट्याचा सहभाग असल्याचे संकेत दिले असून “मॅनिएटर’ बिबट्याविरोधात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी “आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट’ (आरईएसक्यूसीटी) चे आठ सदस्यीय पथक धुळे येथे पोहोचले आहे.
अलीकडे धुळ्याच्या ग्रामीण भागातील बोरकुंड, होरपाडा, नांदळे, मोघन या गावांमध्ये अनेक हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये पाच वर्षांचा मुलगा शेजारच्या होरपाडा गावात आणि नांदळे गावातील आठ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातील मोघण गावात बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही सर्व ठिकाणे एकमेकांच्या जवळ आहेत.
आठ सदस्यीय पथकात पुण्यातील सहा आणि नाशिकच्या दोन जणांचा समावेश असून, बिबट्याचा शोध आणि पकडण्यात वनविभागाला मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहे. या टीममध्ये रेस्क्यू सदस्य, पशुवैद्यक आणि स्निफर डॉगचा ट्रॅकर यांचा समावेश होता, असे या पथकाच्या संस्थापक अध्यक्ष नेहा पंचमिया यांनी सांगितले. हे पथक दोन आघाड्यांवर काम करत आहे.
एक प्रत्यक्ष ट्रॅकिंगमध्ये गुंतले आहे तर दुसरे गावकऱ्यांमध्ये जागृती करण्यात गुंतलेला आहे. रात्रंदिवस हे काम सुरू असून, ग्राउंड टीम बिबट्याचे पायांचे ठसे आणि इतर गोष्टींचा माग काढत आहेत. या शोधासाठी लक्ष्य केलेल्या भागात कॅमेरा ट्रॅप, थर्मल ड्रोन, पिंजरे लावण्यात येत असून, लवकरच बिबट्याचा अचूक मागोवा मिळेल, अशी अपेक्षा पंचमिया यांनी व्यक्त केली.





