पुणे | बारामुल्लातील विद्यार्थ्याला मिळाले जीवनदान

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भारतीय सैन्य दल आणि पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्यामुळे काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथील डॅगर परिवाराच्या विद्यार्थ्याला जीवनदान मिळाले. या दोन्हींच्या मदतीमुळे नऊ वर्षीय बालकावर दिल्लीत हृदयाची गंभीर आणि गुंतागुतीची शस्त्रकिया यशस्वीरित्या पार पडली. दि. ३१ ऑगस्ट २०१५ रोजी जन्मलेल्या मास्टर बुरहानला हृदयासंबंधीचा गंभीर आजार असल्याचे निदान झाले.
मात्र, कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आवश्यक वैद्यकीय उपचार घेणे अवघड होत होते. ही बाब समजल्यानंतर भारतीय लष्कराच्या डॅगर डिव्हिजन आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला.
डॅगर डिव्हिजनच्या सहाय्याने, बुरहानची बारामुल्ला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. तारिक रशीद यांनी प्राथमिक तपासणी केली. त्यात रशीद यांनी बुरहानची हृदय शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
तसेच ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुतीची असल्याने त्यासाठीची आवश्यक वैद्यकीय सुविधा या केवळ दिल्लीत उपलब्ध असल्याचे लक्षात आले. लष्कर आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांनी दिल्लीतील डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानंतर बुरहानला उपचारासाठी दिल्ली कँटन्मेंटमधील आर्मी हॉस्पिटल रीसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे बुरहानवर हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
शस्त्रक्रियेने भारतीय लष्कराच्या मानवतावादी दृष्टीकोनाचे दर्शन घडले. याशिवाय गरजू व्यक्तींसाठी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरवण्याची अतुलनीय वचनबद्धताही यानिमिताने अधोरेखित झाली.
काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथील भारतीय सैन्य दल आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने विशेष मुलांसाठी डॅगर परिवार स्कूल चालवले जाते. फाउंडेशनच्या माध्यमातून या शाळेतील विद्यार्थ्यावर वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळाली आणि त्याला जीवनदान मिळाले, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना अशाच सेवा- सुविधा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. – पुनीत बालन, अध्यक्ष, इंद्राणी बालन फाऊंडेशन.





