Fauji Movie : वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना मिळणार खास सरप्राईज; प्रभासच्या फौजीबाबत मोठी अपडेट समोर
Fauji Movie : प्रभासचा वाढदिवस २३ ऑक्टोबर रोजी असून, याच दिवशी ‘फौजी’ चित्रपटाचा खास प्रमोशनल व्हिडिओ प्रदर्शित केला जाणार आहे.

Fauji Movie : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा असते. ‘स्पिरिट’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर आता त्याच्या ‘फौजी’ या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. आता प्रभासच्या वाढदिवसाचे औचित्य साधत निर्माते ‘फौजी’ची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.
वाढदिवसादिवशी ‘फौजी’ची खास झलक!
प्रभासचा वाढदिवस २३ ऑक्टोबर रोजी असून, याच दिवशी ‘फौजी’ चित्रपटाचा खास प्रमोशनल व्हिडिओ प्रदर्शित केला जाणार आहे. या व्हिडिओतून चित्रपटाची कथा आणि प्रभास साकारत असलेल्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांना माहिती दिली जाणार आहे.
अलीकडेच मौली थनुजच्या ‘डोंगा ना कोडुकू’ या चित्रपटाच्या टीझर प्रदर्शनादरम्यान ‘फौजी’विषयी चर्चा झाली. यावेळी निर्माता रवी शंकर यांना प्रभासच्या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले.
त्यावर त्यांनी प्रभासच्या वाढदिवसादिवशी ‘फौजी’ची खास झलक प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली. रवी शंकर म्हणाले, ‘या व्हिडिओमधून प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथेविषयी आणि प्रभासच्या भूमिकेविषयी प्राथमिक माहिती मिळेल.’
प्रभास साकारणार सैनिकाची भूमिका
‘फौजी’ या चित्रपटात प्रभास एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हनु राघवपुडी यांनी केले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि युद्धाशी संबंधित कथानक असलेल्या या चित्रपटाबद्दल सुरुवातीपासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी प्रभासचे एक पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये त्याच्या हातात बंदूक दिसत असून, त्याचे हात रक्ताने माखलेले आहेत. पोस्टरसोबत निर्मात्यांनी ‘एकटी लढणारी बटालियन’ असे कॅप्शन दिले होते.
‘फौजी’ कधी प्रदर्शित होणार?
‘फौजी’ हा चित्रपट सुरुवातीला डिसेंबर २०२६ मध्ये प्रदर्शित करण्याचा विचार होता. मात्र, नंतर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट मार्च २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
या चित्रपटात प्रभाससोबत जया प्रदा, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दीपक अनंतनी आणि राजेश शर्मा यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.





