पुणे | पुण्यात आघाडीत पुन्हा वादाची ठिणगी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून शनिवारी पुण्यात पश्चिम महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत शहर काँग्रेसकडून पुण्यातील सहा विधानसभा पैकी पाच विधासभा जागांची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीतील फुटीमुळे शहरात राष्ट्रवादीची ताकद घटल्याने हे मतदारसंघ काँग्रेसला मिळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडीचे जागा वाटप वरिष्ठ पातळीवर निश्चित होणार असून ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्यापक्षाची जागा हे प्राथमिक सूत्र आहे.
त्यामुळे स्थानिक नेत्यांनी सांभाळून भूमिका मांडावी, असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडून शहरातील कसबा, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट, हडपसर तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघांची मागणी करण्यात आली आहे. त्याला राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. यामध्ये हडपसरमधून स्वत: प्रशांत जगताप इच्छूक आहेत.
विधानसभेचे जागा वाटप वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. राष्ट्रवादी कमकुवत झाल्याचे सांगत आहेत. जागा वाटपाचा अधिकार काँग्रेसचे वरिष्ठ नेते करतील.
मात्र, जागा वाटप बाबत काँग्रेस नेत्यांनी मने दुखावतील, अशी वक्तव्ये करू नयेत. पुण्यात अथवा राज्यात जागा वाटप झालेले नाही. त्यामुळे, कोणीही त्याबाबत वक्तव्ये करू नयेत. – प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
आम्ही राष्ट्रवादी काँग़्रेस कमकुवत झालेली आहे, असे म्हणालो नाही. आम्ही ज्या पाच मतदारसंघाची मागणी केली आहे त्यात, आमची ताकद वाढली आहे, अशी भूमिका आहे. शहर पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका बैठकीत मांडली आहे.
त्यावर पक्ष पातळीवर निर्णय होईल. ही निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. कोणीही गैरसमज करून घेण्याची गरज नाही. – अरविंद शिंदे. काँग्रेस पुणे शहराध्यक्ष




