Pune Graduate constituency Election 2026: पुणे पदवीधरच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा?
Pimpri-Chinchwad: तीन नेतेच निर्णय घेणार : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सूचक वक्तव्य

पिंपरी – पुणे पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत असल्याने महायुतीतच या जागेवरून मिठाचा खडा पडला असल्याचे चित्र आहे. असे असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी याबाबत महायुतीतील तीन पक्षांचे तीन नेतेच याबाबत अंतिम निर्णय घेतील सांगत तोडगा निघणार असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.
पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आलेल्या रवींद्र चव्हाण यांनी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या जागेचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिघे मिळून घेतील असे मंगळवारी (दि. २९) जाहीर केले.
पिंपरीतील कासारवाडी येथे शहर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी पदवीधर निवडणूक, राज्यातील दुष्काळ आणि विरोधकांचे राजकारण यावर परखड मत मांडले. ते म्हणाले, विदर्भातील २, पश्चिम महाराष्ट्रातील २ आणि मराठवाड्यातील १ अशा विधान परिषदेच्या पाचही जागांवर पक्षाची तयारी पूर्ण झाली आहे.
कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पदवीधर आणि शिक्षकांची नोंदणी केली असून, आता या नोंदणीकृत मतदारांना मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी केंद्रांपर्यंत आणण्याचे सूक्ष्म नियोजन सुरू आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा उल्लेख करत चव्हाण म्हणाले की, महायुती सरकार मायबाप सरकार म्हणून राज्यातील शेतकरी आणि जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ दुष्काळ निवारणासाठी ठोस उपाययोजना आणि दीर्घकालीन नियोजन करत आहे.
विरोधकांचे राजकारण दिशाहीन
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ४ ऑक्टोबरला मुंबईत काढणार असलेल्या संयुक्त मोर्च्याबाबत विचारले असता चव्हाण यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. निवडणूक आयोग, मुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रवक्त्यांनी याआधीच संबंधित विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा उरलेला नसल्याने ते दिशाहीन राजकारण करत आहेत. अशा बिनबुडाच्या आरोपांकडे आणि मोर्च्यांकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल, असा टोला त्यांनी लगावला.
महापालिका पदाधिकाऱ्यांचे टोचले कान
पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सुरू असलेल्या कारभाराबाबत देखील चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. महापालिकेच्या प्रत्येक बाबींची माहिती घेत पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच पक्षाच्या सेवा संकल्प अभियानाची आणि संघटनात्मक बांधणीची झाडाझडती घेतली. स्थानिक माथाडी मेळाव्याला हजेरी लावण्यासोबतच त्यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट देऊन संवाद साधला.





