Traffic Solution: चिंचवडच्या वाहतूक कोंडीला फुटणार वाट! चार महत्त्वाच्या प्रकल्पांची निविदा प्रसिद्ध
कल्पतरू चौकात सबवे, चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ नवीन उड्डाणपूल, पी. के. चौक सिग्नलमुक्त होणार

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चार महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळाली आहे. वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड आणि थेरगाव परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चार प्रकल्पांची ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या कामांमुळे मतदारसंघातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली.
चिंचवड मतदारसंघातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. ही समस्या सोडविण्यासाठी आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने चार महत्त्वाच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
यामध्ये वाकड ते नाशिक फाटा मार्गावरील कल्पतरू चौकात सबवे उभारण्यात येणार आहे. चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. पिंपळे सौदागर येथील पी. के. चौक सिग्नलमुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. तसेच डांगे चौकातील ग्रेड सेपरेटरची थेरगाव फाट्याकडील लांबी वाढविण्यात येणार आहे.
या चारही प्रकल्पांमुळे संबंधित परिसरातील वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. चौकांमधील सिग्नलवरील प्रतीक्षा वेळ कमी होऊन वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होण्याची अपेक्षा आहे. निविदा प्रसिद्ध झाल्याने आता या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
“नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या चार प्रकल्पांमुळे वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्यास मदत होईल. नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचावा आणि मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था सक्षम व्हावी, हा या कामांचा मुख्य उद्देश आहे,” – आमदार शंकर जगताप, चिंचवड मतदारसंघ
Pune District : फुलेंचे विचारआचरणात आणणे काळाची गरज- प्रा. दुर्गाडे





