डेहराडून – भारताची लवकरच अमेरिका व्हायला सुरुवात झाली आहे. इथेही आता शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरात पिस्तूल दिसून येऊ लागले आहे. बुधवारी, उत्तराखंडमधील काशीपूर (उधमसिंग नगर) येथील एका खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थ्याने पिस्तूल काढून शिक्षकावर गोळीबार केला. त्यामुळे शिक्षक गंभीर जखमी झाले. दोन दिवसांपूर्वी शिक्षकाने एका प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्याबद्दल विद्यार्थ्याला चापट मारली होती आणि त्याच चापटीचा बदला घेण्यासाठी, विद्यार्थ्याने शाळेतून येत असताना जेवणाच्या डब्यात पिस्तूल आणले होते. वर्ग संपताच विद्यार्थ्याने मागून शिक्षकांच्य खांद्याच्या खाली गोळी झाडली. गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव गगनदीप कोहली आहे. गोळी शिक्षकाच्या उजव्या खांद्याच्या खाली लागली आणि ती मणक्याजवळ अडकली. एका खासगी रुग्णालयात तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी शरीरातून गोळी काढली. शिक्षकाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, पुढील ७२ तास खूप महत्वाचे असतील. सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक टीमने प्रत्यक्षदर्शींचे पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे आणि त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणात, पिस्तूल घरात कसे आले आणि विद्यार्थ्याने ते कसे मिळवले हे जाणून घेण्यासाठी पोलिस आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांचीही चौकशी करत आहेत.