जलधारांचा तिरंग्याला “सॅल्यूट’ ! पुणेकरांच्या “प्रभात फेरी’त उमटली देशभक्तीची भावना

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 -“वंदे मातरम्,.., भारत माता की जय…, हर घर तिरंगा’अशा घोषणांमधून प्रकटणारी देशभक्तीची भावना.. युवक, महिला व लहानापासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या हाती असलेला तिरंगा. देशभक्तीच्या भावनेला जोरदार पावसाच्या जलधारांनीही बरसत दिलेली साथ, अशा उत्साहाच्या वातावरणात पुणेकर नागरिकांनी पावसात उत्साहाने “प्रभात फेरी’मध्ये सहभाग नोंदवला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपविभागीय अधिकारी हवेली आणि त्याअंतर्गत हवेली, पुणे शहर तहसील कार्यालय आणि हवेली पंचायत समितीच्या सहकार्याने बुधवारी सकाळी मामलेदार कचेरी येथून शुभारंभ झालेल्या “प्रभात फेरी’ला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. “प्रभात फेरी’च्या मार्गावरील नागरिकही यामध्ये सहभागी होत गेल्याने रॅलीतील उत्साह वाढला.
पावसातही हातात तिरंगा घेऊन नागरिक भारतमातेचा जयघोष करीत होते. विधानभवन येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत या “प्रभात फेरी’चा समारोप झाला.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील, तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के यांच्यासह विभागाचे प्रमुख अधिकारी यांनी देखील “प्रभात फेरी’त सहभाग घेतला. विधानभवन येथे स्वातंत्र्य सैनिक हरिहर नाबर यांचा तसेच सरसेनापती पिलाजीराव जाधवराव यांचे वारस मंदाकिनी जाधवराव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.





