पुणे | पुलाच्या कठड्यावरून पडलेला शाळकरी मुलगा वाहून गेला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुलाच्या कठड्यावर बसलेला शाळकरी मुलगा तोल जाऊन नदीत पडला. ही घटना पूना हॉस्पिटल येथील पुलावर सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशन दलाने शोधकार्य सुरू केले.
नदीचे पाणी बघण्यासाठी शहरातील सर्वच पुलावर नागरिक गर्दी करत होते. पूना हॉस्पिटल येथील पुलावरही काही नागरिक पाणी पहायला थांबले होते. तेथे अंदाजे बारा वर्षाचा मुलगा शाळा सुटल्यावर पाणी पाहण्यासाठी पुलाच्या कठड्यावर दफ्तर घेऊन बसला होता.
मात्र, अचानक तो नदीत पडला. त्याने काही वेळ पोहण्याचा प्रयत्नही केला. मात्र, प्रवाह जोरदार असल्याने वाहत पुढे गेला. नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. जवानांनी तातडीने टिळक पूल, संगम पूल आणि बंडगार्डन पुलावर जवानांना पाठवले. मात्र, रात्री उशिरापर्यंत मुलगा सापडला नव्हता. तो कोणत्या शाळेत होता हेही कळू शकले नाही.
डोक्यात झाडाची फांदी पडल्याने विद्यार्थी गंभीर जखमी
रस्त्यावरुन जाताना झाडाची फांदी पडून २२ वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. जखमी विद्यार्थ्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना कर्वेनगर येथील मधुबन सोसायटीसमोर घडली.
प्रसाद रघुवीर वाक्षे ( २२, मूळ गाव – वाक्षेवाडी, ता. आटपाटी, जि. सांगली ) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या मेंदूला जबर मार लागला असून, चेहरा तीन ठिकाणी फॅक्चर झाला आहे. प्रसाद हा फर्गसन महाविद्यालयात एम.ए. प्रथम वर्षात शिकत आहे. त्याचबरोबर तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही करत आहे.





