Indapur : गुरुकुल गोखळी येथे विठ्ठल नामाची शाळा भरली; विद्यार्थ्यांचा आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात

इंदापूर : वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले,पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर’, अशा विठ्ठलमय वातावरणात गुरुकुल विद्यामंदिर गोखळीतील शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला.
गुरुकुल संस्थेचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ,व मुख्य विश्वस्त भरत हरणावळ यांच्या मार्गदर्शनाखाली,दरवर्षी प्रमाणे यंदाही गुरुकुल गोखळीमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते.
कोणी विठोबा, तर कोणी वासुदेव बनले होते.सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगणाचे देखिल आयोजन करण्यात आले होते,मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून,हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.
एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं,मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी,कपाळी बुक्का,गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा,डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली,शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी गुरुकुल गोखळी मध्ये अवतरले.
यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला.अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. सुरेश वरकड व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी ‘जय जय राम कृष्ण हरी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांचे, स्वाती म्हेत्रे अंती जाशील एकलाच प्राण्यां अभंगाचे गायन केले.
तसेच टाळ व वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून,प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण गुरुकुल गोखळीतील शाळेच्या क्रीडागंणावर निर्माण केले. विद्यार्थी आणि शिक्षकानी पारंपारिक वारकरी वेशभूषा, तुळशी व भगवद्ध्वज घेऊन अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली. रिंगण आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विठूरायाची भजने गात आणि पसायदान म्हणत ह्या सोहळ्याचा शेवट झाला.





