स्कूल बस आणि बीएमडब्ल्यू कारची समोरासमोर धडक

पिंपरी – वाहतूक नियमांचा भंग करून बीआरटी मार्गातून जाणाऱ्या स्कूल बस आणि बीएमडब्ल्यू कारची समोरासमोर धडक बसली. या अपघातात कारचालकासह बसमधील दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.सोमवारी (दि. २९) दुपारी बारा वाजताच्या सुमारास ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे हा अपघात झाला.
यश अरुण मित्तल (वय २९, रा. भेळचौक, निगडी) असे जखमी कार चालकाचे नाव आहे. योगेश एकनाथ खोडके (वय २८, रा.फुलेनगर कॉलनी, आळंदी रोड) असे बसचालकाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी यश मित्तल हा त्याच्या ताब्यातील बीएमडब्ल्यू कार (एमएच १४/केएल ५४९९) घेऊन ऑटो क्लस्टर येथील बीआरटी मार्गातून जात होता. त्याचवेळी एका खासगी शैक्षणिक संस्थेची स्कूलबस बीआरटी मार्गातून समोरून येत होती. कार आणि स्कूल बसची समोरासमोर जोरात धडक बसली. यामध्ये स्कूल बसचा पुढील भाग चक्काचूर झाला. तसेच कारचेही मोठे नुकसान झाले.
स्कूलबसमध्ये १५ विद्यार्थी होते. त्यातील दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले. विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बसमधून बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर बीआरटी मार्गाच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, अपघातस्थळी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही गर्दी केली. यामध्ये कारचालक मित्तल जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.




