धावत्या बसने घेतला पेट; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी मारल्या उड्या, ५ जणांनी गमावला जीव

Lucknow Bus Fire | बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या एका बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे.गुरुवारी पहाटे लखनऊच्या किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतला. ज्यात 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले आहे. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृत्यू झालेले सर्वजण बिहारचे रहिवासी आहेत.
शॉर्ट सक्रिटमुळे बसने अचानक पेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. काही क्षणातच आगीने संपूर्ण बसला वेढले. आग लागल्यानंतर बस चालक आणि कंडक्टरने बसमधून उडी मारून जीव वाचवला. बसमधील ८० प्रवाशांनी बसच्या काचा फोडून स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. आग लागलेली बस जवळपास एक किलोमीटर धावत राहिली.
मृतांमध्ये 2 चिमुकल्यांचाही समावेश
मृतांमध्ये अशोक महतो यांची पत्नी लक्ष्मी देवी (55), अशोक महतो यांची मुलगी सोनी (26), रामलाल यांचा मुलगा देवराज (3), रामलाल यांची मुलगी साक्षी कुमारी (2) आणि एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला असून ज्याची ओळख अद्याप पटली नाही. Lucknow Bus Fire |
खिडक्या तोडून उडी मारण्याचा प्रयत्न
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, किसानपथ परिसरात अचानक चालत्या बसला आग लागली. आग इतकी भयानक होती की बस मधील प्रवासी ओरडू लागले. काही क्षणातच आगीने संपूर्ण बसला विळखा घातला. काही प्रवासी दरवाजाकडे धावले, तर काहींनी खिडक्या तोडून उडी मारण्याचा प्रयत्न केला. Lucknow Bus Fire |
मात्र, खिडक्यांना लोखंडी रॉड बसवलेल्या असल्याने उडी मारण्यात अडचणी आल्या. ज्यानंतर रस्त्यावरील लोकांनी तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. या घटनेनंतर डीसीपी आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, पोलिसांनी या घटनेच्या अधिक तपासाला सुरूवात केली आहे.
हेही वाचा:
Devendra Fadnavis : भारतीय लष्कराने दहशतवादाचे कंबरडे मोडले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक





