देहूमध्ये पिसाळलेल्या कुत्रीचा थरार! एकटीनेच १३ जणांचा घेतला चावा; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

प्रभात वृत्तसेवा
देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू येथील चव्हाण नगर भाग २- मध्ये शुक्रवारी ( दि.९ ) मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यापैकी एका पिसाळलेल्या कुत्रीने ३ बालके व ४ महिलासह १३ जणांचा चावा घेतला. रेस्क्यू पथक, नगरपंचायतच कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्रीला पकडून उपचारार्थ मांजरी येथील पशू वैद्यकीय रुग्णालयात पाठवले आहे.
तीर्थक्षेत्र देहू परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे लहान मुले, महिला, वयोवृद्ध नागरिकांसह दुचाकी चालक ही धास्तावले आहेत. ही मोकाट कुत्रे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून देहूच्या गायरान जमिनीवर आणि हद्दीत सोडत असल्याचे नागरिकांनी आरोप केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते शैलेश चव्हाण, रेस्क्यू पथकातील महिला अक्षदा खंडागळे, गणेश गायकवाड, सचिन गायकवाड, नगरपंचायतीचे संदीप कुऱ्हाडे,अजय वाल्मिकी आदींनी सापळा लावून पकडले. पिसाळलेल्या कुत्रीला उपचारार्थ दवाखान्यात पाठवले.
आरोग्य केंद्रात इंजेक्शन उपलब्ध नाही
देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुत्रे चावल्यानंतर उपचारार्थ लागणारे प्रथम इंजेक्शन देखील उपलब्ध नाही. यामुळे जखमी नागरिकांना पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील यमुनानगरच्या मनपा दवाखान्यात धाव घ्यावी लागत आहे.





