Khatija Rahman : ए. आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; बहीण खतिजाने सांगितला घटनाक्रम, प्रकृतीबाबत दिली अपडेट
Khatija Rahman : अपघाताबाबत विविध वृत्तांमध्ये वेगवेगळ्या माहितीचा उल्लेख होत असल्याने खतिजाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे वस्तुस्थिती मांडली.

Khatija Rahman : प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए. आर अमीन (A. R. Ameen) याचा सोमवारी पहाटे चेन्नईमध्ये कार अपघात झाला. या अपघातानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आता अमीनच्या प्रकृतीबाबत त्याच्या बहिणीने मोठी अपडेट दिली आहे.
अमीनची बहिण खतिजा रहमान (Khatija Rahman) हिने सोशल मीडियावरून यासंदर्भात एक पोस्ट शेअर करत अपघाताबाबत महत्वाची माहिती दिली. पोस्टमध्ये खतिजाने अमीन सुरक्षित असून त्याच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले.
अपघाताबाबत विविध वृत्तांमध्ये वेगवेगळ्या माहितीचा उल्लेख होत असल्याने खतिजाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे वस्तुस्थिती मांडली. चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आभार मानताना तिने, “तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांबद्दल मनापासून धन्यवाद. देवाच्या कृपेने अमीन पूर्णपणे सुरक्षित आहे,” असे म्हटले आहे.
नेमकं काय घडलं?
खतिजाने दिलेल्या माहितीनुसार, अमीन विमानतळाकडे जात होता. त्यावेळी त्याचा मित्र कार चालवत होता, तर अमीन त्याच्या ड्राव्हिंग सीटच्या शेजारील सीटवर बसला होता. त्यांच्या पुढे असलेल्या एका वाहनचालकाने सिग्नल असतानाही वाहन पुढे नेल्याने दोन्ही वाहनांमध्ये धडक झाली. ती म्हणाली की, या अपघातात अमीन, त्याचा मित्र तसेच दुसऱ्या वाहनातील व्यक्ती सुरक्षित आहेत. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
यासोबतच खतिजाने प्रसारमाध्यमांना बातम्या प्रकाशित करण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करण्याचे आवाहन केले. अपूर्ण किंवा चुकीच्या माहितेमुळे कुटुंबीयांमध्ये आणि चाहत्यांमध्ये अनावश्यक चिंता निर्माण होऊ शकते, असे तिने नमूद केले.
आयएएनएसच्या वृत्तानुसार, सोमवारी पहाटे सुमारे ३.३० वाजता चेन्नईतील जवाहरलाल नेहरू रोडवरून गिंडीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. ऑलिम्पिया टेक पार्क परिसरात अमीन आणि त्याच्या मित्राच्या कारची एका कॅबशी धडक झाली.
अपघातानंतर अमीन आणि त्याच्या मित्राला किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आला. कॅबमधील एका प्रवाशालाही दुखापत झाली होती. त्याच्यावर उपचार करून त्यालाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
दरम्यान, या अपघाताचा तपास वाहतूक विभागाकडून सुरू आहे. अपघात नेमका कसा घडला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही वाहनांतील चालक आणि प्रवाशांचे जबाबही नोंदवले जाणार आहेत.






