Pimpri : रेनकोट खरेदीचा प्रस्ताव अन रद्दची घाई

पिंपरी: संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. पालखी सोहळ्यामधील वारकर्यांसाठी महापालिकेच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात येणार होते. त्यासाठी जनसंपर्क विभागाने भांडार विभागाकडे मागणी केली. मात्र, या प्रस्तावाची वाच्यता होताच विभागप्रमुखांनी खरेदी रद्द करत असल्याचे स्पष्ट केले.
सन २०१६ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने दिंडीप्रमुखांना देण्यासाठी विठ्ठल रखुमाई मूर्ती खरेदी केल्या. त्यामध्ये अनियमितता झाली असून २५ लाखांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप झाला. त्याचे पडसाद २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये उमटले अन राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर २०१८ मध्ये भाजपच्या सत्ताकाळात ताडपत्री खरेदी करण्यात आली. त्यावरून देखील सत्ताधारी आणि प्रशासनावर टीका झाली.
त्यानंतर दिंडीप्रमुखांनी आम्हाला कोणतीही वस्तू देऊ नका अशी विनंती केली. तेव्हापासून महापालिकेच्या वतीने वारकर्यांना प्रथमोपचार पेटी व पिशवी दिली जाते. मात्र, यावर्षी दिंडीप्रमुखांची मागणी नसतानाही जनसंपर्क विभागाने रेनकोट खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला. तशी मागणी भांडार विभागाकडे केली. ही खरेदी थेट पद्धतीने करण्यात येणार होती. याबाबत वाच्यता झाल्यानंतर सोमवारी (दि. १६) अचानक ही खरेदी रद्द करणार असल्याचे जनसंपर्क विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले.
एका दिंडीला दहा रेनकोट देण्याबाबत विचार सुरू होता. वाटप करण्याची जबाबदारी घेण्यासाठी वारकरी तयार नसल्याने रेनकोट खरेदी रद्द करण्यात येत आहे.
– अण्णा बोदडे, उपायुक्त, जनसंपर्क विभाग.





