एक पोस्ट, उद्ध्वस्त करेल आयुष्य! सामाजिक शांतता सुव्यवस्था बिघडविण्याचे कृत्य करणाऱ्यांवर सायबर पोलिसांचा वॉच

जामखेड – दोन जाती-धर्माच्या भावना दुखावतील, अशा आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमातून व्हायरल करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात अल्पवयीन मुले, महाविद्यालयीन तरुणांचाही समावेश आहे. पण, तो दखलपात्र अपराध असून एक पोस्ट आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरू शकते. नागरिकांनीही अशी पोस्ट पाहिल्यास कायदा हातात न घेता जवळील पोलिस ठाण्यास कळवावे. संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिला आहे.
सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करीत आहेत. पण, तरुणांनी त्याला बळी न पडता स्वत:चे आयुष्य, आपले आई-वडील, भाऊ-बहिणीचा विचार करावा. एकदा गुन्हा दाखल झाला की पुन्हा शासकीय नोकरी नाही. ना परदेशात शिक्षणाची संधी, हे तरुणांनी ध्यानात ठेवावे. तसेच पालकांनीही आपली मुले काय करतात, कोणासोबत फिरतात, यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.
सध्या तरुणांकडून व्हॉट्सप, ट्टिटर, फेसबुक व इन्स्टाग्रामचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. दोन जातीधर्मात तेढ निर्माण होईल आणि त्यातून सामाजिक शांतता सुव्यवस्था बिघडविण्याचे कृत्य करणाऱ्यांवर सायबर पोलिसांचा वॉच आहे. आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे, सोशल मीडियावर तेढ निर्माण करणारे स्टेट्स ठेवणे असे प्रकार टाळावेत, अन्यथा दोन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास अटळ असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ज्याच्यासाठी करतात ते सुद्धा फिरकत नाही
अनेक शिक्षित तरुण कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या सच्चा कार्यकर्ता आहे. आपल्या नेत्यासाठी जीवाचे रान करतात, मात्र अशा काही प्रसंगात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यावर सोडवणे तर दूरच मात्र नेते पोलीस स्टेशनकडे फिरकत नसल्याचे वास्तव आहे. सोडवायला कोणीही येत नाही. अशा प्रसंगातून तरुणांनी बोध घेतला पाहिजे.





