पुण्यात आज राजकीय भूकंप! तब्बल २२ माजी नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिका निवडणुकांची घोषणा झाली असून, सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती संपवून उमेदवारांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे. असे असतानाच शहरातील शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच काॅग्रेसमधील माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
उद्या (शनिवारी) मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच हे प्रवेश होणार होते. मात्र, वेळ अमावस्येमुळे हे प्रवेश दोन दिवस पुढे ढकलण्यात आले होते. शहर पदाधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत.प्रामुख्याने मागील निवडणुकीत भाजपने ज्या जागा गमावल्या होत्या.
तसेच, या निवडणुकीत ज्या माजी नगरसेवकांचे तिकीट कापले जाणार आहे, अशा जागांवर इतरांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. पक्षाकडे सुमारे अडीच हजार इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या असतानाही हे प्रवेश केले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या प्रवेशाला पुण्यातील स्थानिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतले होते.
तसेच त्यावरून वादही झाले होते. त्यानंतर आता पक्षाकडून स्थानिकांची समजूत काढत हे प्रवेश घेतले जाणार आहेत. तर ज्या प्रवेशावरून वादाची शक्यता आहे त्यांना थेट उमेदवारी देत पक्षाकडून ए. बी फाॅर्म दिले जाणार आहेत.





