Bashir Badr: “स्वतःच्या कविता विसरलेले शायर”; बशीर बद्र यांचं ९१ व्या वर्षी निधन
Bashir Badr बशीर बद्र यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९३५ रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे झाला.

Bashir Badr: उर्दू शायरीला साधी, भावस्पर्शी आणि सर्वसामान्यांच्या मनाला भिडणारी भाषा देणारे ज्येष्ठ शायर बशीर बद्र यांचं वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही वर्षांपासून ते डिमेन्शिया या आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात हळहळ व्यक्त होत असून चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
“मुसाफिर हैं हम भी, मुसाफिर हो तुम भी…” यांसारख्या अनेक अजरामर ओळी लिहिणारे बशीर बद्र हे आधुनिक गझलांचे उस्ताद मानले जात होते. त्यांच्या शायरीत प्रेम, वेदना, आठवणी आणि आयुष्याचं वास्तव अतिशय साध्या भाषेत मांडलेलं असायचं. त्यामुळे त्यांची गझल सामान्य लोकांपर्यंत सहज पोहोचली.
बशीर बद्र यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९३५ रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे झाला. त्यांच्या आयुष्याची सुरुवात मात्र संघर्षांनी भरलेली होती. वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून केवळ ८५ रुपयांच्या पगारावर पोलिस खात्यात नोकरी करावी लागली. पण शायरीची आवड त्यांनी कधीच सोडली नाही. वयाच्या वीसाव्या वर्षीच त्यांच्या गझला मासिकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या.
नंतर त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि पीएचडीही केली. त्यानंतर ते उर्दू विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यांच्या लेखणीतून आलेल्या गझलांनी त्यांना देशभर प्रसिद्धी मिळवून दिली.

Bashir Badr
मात्र १९८७ साली त्यांच्या आयुष्यात मोठं दुःख आलं. मेरठमधील दंगलीत त्यांचं घर जाळण्यात आलं. या आगीत त्यांच्या अनेक अप्रकाशित कविता, दुर्मीळ पुस्तके, कागदपत्रं आणि आयुष्यभराची कमाई राख झाली. या घटनेने ते पूर्णपणे हादरले. त्यांनी मेरठ कायमचं सोडलं आणि भोपालमध्ये स्थायिक झाले.
या कठीण काळात प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी त्यांना मोठा आधार दिला. विशाल हे त्यांचे विद्यार्थी होते. त्यांनी स्वतःच्या आठवणीतून बशीर बद्र यांच्या अनेक गझला पुन्हा लिहून त्यांना दिल्या. त्यामुळे त्यांच्या साहित्याचा मोठा भाग वाचू शकला.
जीवनाच्या शेवटच्या काळात डिमेन्शियामुळे त्यांची स्मरणशक्ती खूप कमी झाली होती. इतकंच नाही तर त्यांनी स्वतः लिहिलेल्या अनेक गझलाही ते विसरले होते. तरीही त्यांच्या ओळी आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत.
भारतीय साहित्याला दिलेल्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ‘इकाई’, ‘आमद’, ‘आहट’, ‘आस’ आणि ‘आसमान’ हे त्यांचे गझलसंग्रह विशेष गाजले.
त्यांच्या जाण्याने उर्दू साहित्यविश्वातील एक तेजस्वी तारा कायमचा निखळला आहे.





