Indapur : नीरा-भीमाच्या शिरपेचात राष्ट्रीय मानाचा तुरा
Indapur : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इंदापूर : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा इंदापूरच्या सहकार क्षेत्राचा झेंडा उंचावला आहे. सन २०२५-२६ च्या गाळप हंगामातील उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मंगळवारी (दि. २२) नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे आणि संचालक मंडळाने हा राष्ट्रीय सन्मान स्वीकारला. नीरा-भीमा कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामातच देशपातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मिळाल्याने कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोहळ्याचे प्रास्ताविक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांच्यासह महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, विविध राज्यांतील सहकार मंत्री, पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील-ठाकरे, राजवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच देशभरातील सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक उपस्थित होते.
नीरा-भीमा कारखान्याला आजवर राज्य व देशपातळीवरील एकूण १४ पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली. त्यामुळे या नव्या राष्ट्रीय पुरस्काराने इंदापूरच्या सहकार क्षेत्रातील कारखान्याच्या कामगिरीची राष्ट्रीय पातळीवरील नोंद आणखी ठळक झाली आहे .या पुरस्काराबद्दल हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूकदार, अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतकांचे अभिनंदन केले.
पुरस्कार स्वीकारताना लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अॅड. कृष्णाजी यादव, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.
नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यास मिळालेला देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार हा केवळ कारखान्याचा सन्मान नसून ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूकदार, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक कष्टांचा गौरव आहे. रौप्यमहोत्सवी गळीत हंगामात मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार आमच्यासाठी विशेष अभिमानाचा क्षण आहे.
-भाग्यश्री पाटील, चेअरमन .





