नगर – चौंडी येथे राज्य सरकारकडून साजरा होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात अडथळा न आणता, स्टंटबाजी न करता राजशिष्टाचाराचे पालन करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शासकीय कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे आमदार राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.
चौंडी येथे यंदा राज्य सरकारकडून अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. आमदार पवार यांनी स्वतंत्र कार्यक्रम घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली, मात्र ही परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर आ. पवार यांनी स्वतंत्र कार्यक्रम होणारच असे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर आमदार शिंदे यांनी आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात चैत्यभूमी, दीक्षाभूमी तसेच रायगड व शिवनेरी येथेही शासकीय कार्यक्रम आयोजित केला जातो. तेथे कोणी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करत नाहीत. शासकीय कार्यक्रमात सर्व सहभागी होतात. त्याच पद्धतीने चौंडी येथे शासकीय कार्यक्रम होणार आहे. गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकारचे असताना त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु आपण चौंडी गावचे रहिवासी असूनही आपल्याला निमंत्रित केले नव्हते.
आमदार पवार यांनी कार्यक्रमात बदल केला, शोभायात्रा व इतर कार्यक्रम रद्द केले. त्याऐवजी आदल्या दिवशी कार्यक्रम आयोजित केले आहेत. मात्र हे चुकीचे आहे. जयंती दुसऱ्या दिवशी असताना आदल्या दिवशीच कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे महापुरुषांची अवहेलना करण्यासारखी आहे, असा आरोप केला.
‘श्रेष्ठींमुळे मी गप्प बसलो’
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संदर्भात वस्तुस्थिती व वस्तुनिष्ठ जे होते, ते मी पक्षश्रेष्ठींकडे दिले होते. त्यावर विखेंकडून काही प्रत्युत्तर आले नाही म्हणजे मी केलेला दावा खरा होता, परंतु श्रेष्ठींच्या सांगण्यामुळे मी याआधी दोनदा गप्प बसलो व आताही गप्प आहे, असे सूचक भाष्य आमदार प्रा. शिंदे यांनी यावेळी केले. दरम्यान, राधाकृष्ण विखे हे सीनियर मंत्री आहेत. त्यांनी माझी जबाबदारी घेतल्याचे जाहीर करणे, याचे मी स्वागत करतो, असे आ. शिंदे म्हणाले.