नवी दिल्लीः मंगळवारी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते देण्यात आला. या सोहळ्यातील काही फोटो शरद पवारांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केले असून भाषणात एकनाथ शिंदे आणि सातारा कनेक्शनमध्ये मजेदार किस्सा सांगितला आहे.
जा मुली जा, तु दिल्या घरी सुखी रहा’
आज या ठिकाणी एकनाथरावांचा सन्मान आहे. त्यांनी सांगितलं की, आम्ही सगळे सातारकर आहोत. माझी गंमतीची गोष्ट आहे, दोन ठिकाणी मला अडचणी होतात. एक ठाणे महानगर पालिकेमध्ये सन्माननीय सभासद होते, अनेक वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था चालू होती. माझा आणि त्या संस्थेचा कधी संबंध आला नाही. एकदा वेगळ्या अशा प्रकारचं व्यासपीठ होतं, अनेक मोठे नेते होते. मला आठवतंय, हेगडे यांचं नेतृत्व होतं व प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू त्याठिकाणी होते.
मराठीतले एक महत्वाचे कवी जे सातारकर होते त्यांचं नाव पी. सावळाराम. त्यांची काही गाणी ही खेड्यापाड्यात सुद्धा लोकांच्या मुखात होती. एक काळ असा होता की, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मुला- मुलींचं लग्न लागलं की सनईवर किंवा रेकॉर्डवर एक गाणं यायचं ‘जा मुली जा, तु दिल्या घरी सुखी रहा’ वगैरे.. त्याचे कवी सावळाराम पाटील हे ठाण्याचे नगराध्यक्ष आणि सातारकर होते.
काय उद्योग करायचे ते माहित होते. ते उद्योग केले आणि….
मला याची आठवण झाली त्याला एक कारण आहे. मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी होतो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, ग. दि. माडगूळकर आमदार होते आणि ठाण्याला निवडणूक होती. माडगूळकरांनी नाईक साहेबांना सांगितलं की, आमच्या सावळाराम पाटलाला अध्यक्ष करा. पक्षाचा सचिव म्हणून मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की ठाण्याला जायचं, दोन- तीन दिवस बसायचं आणि काहीही झालं तरी सावळाराम पाटील अध्यक्ष होतील हे बघायचं. आता मी काँग्रेसवालाच होतो, काय उद्योग करायचे ते माहित होते. ते उद्योग केले आणि त्यांना त्याठिकाणी अध्यक्ष केलं.
राजधानी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात आज सर्व मान्यवर मंडळींसह उपस्थिती लावली. या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या कुटुंबाचं प्रचंड योगदान आहे ते ज्योतिरादित्य सिंधिया (शिंदे), केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ज्यांचा आपण… pic.twitter.com/XoktiFXvEx
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 11, 2025
येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला..!
मी नाईक साहेबांना फोन केला की तुमचं काम झालंय. ते म्हटले त्यांना घेऊन या. कारण ही सूचना माडगूळकरांची होती आणि सुदैवाने माडगूळकर आज माझ्या घरी आहेत. मी सावळाराम पाटलांना बरोबर घेतलं आणि नाईक साहेबांच्या घरी ‘वर्षा’वर गेलो. माडगूळकर यांनी त्यांना मिठी मारली आणि माझ्या पाठीवर थाप मारली. ‘गड्या, मोठं काम केलं तु’.. ‘येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला’..! सावळाराम पाटील यांच्या गावाचे नाव येडं मच्छिंद्र.
त्यामुळे येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला हे मोठं काम तू केलं, म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं होतं. त्या ठाण्याच्या महानगर पालिकेमध्ये हे सावळाराम होते, शिंदे साहेब होते, रांगणेकर होते. ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचा मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती, हे याठिकाणी सांगायला हरकत नाही.
साहित्य संमेलनावर केले भाष्य
एक आनंदाची गोष्ट अशी आहे की, यंदाच्या वर्षीचं मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये होतंय. अनेक वर्षांनंतर हा योग आलाय. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं, ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते आणि त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. इतका काळ लोटल्यानंतर मराठी भाषिकांना देशाच्या राजधानीमध्ये ही संधी मिळते. त्याच्यामध्ये सरहद आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, साहित्य परिषदेने पुढाकार घेतला व कष्ट केले त्याबद्दल त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन केले.