जिल्हा शिवसेनेच्या गटांचे समांतर शक्तिप्रदर्शन

संदीप राक्षे
सातारा – जिल्ह्यात शिवसेनेची दोन शकले झाली असून या दोन्ही गटांच्या जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर दोन्ही गटांचे समांतर शक्तिप्रदर्शन सुरू झाले आहे. आगामी राजकीय घडामोडींमध्ये दोन्ही गट एकमेकांना शह- काटशह देणार हे आता निश्चित झाले आहे. शिवसेना नक्की कोणाची हा वाद घटनापीठाकडे वर्ग झाल्याने कोणता गट कोणाला भारी पडणार याचे उत्तर आत्ताच देणे अवघड आहे.
जिल्ह्यात शिंदे गटाचे दोन आमदार लाभले आहेत. यामध्ये पाटणचे आमदार व विद्यमान उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई तसेच कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा समावेश आहे. साताऱ्यात शिंदे गटाची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये शिंदे गटात सामील झाल्याने ठाकरे गटाच्या कट्टर चंद्रकांत जाधव यांच्याकडे संघटकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात बाजूला पडलेले पुरुषोत्तम जाधव अचानक चर्चेत घेऊन त्यांच्याकडे शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. ठाकरे गटात सेनेच्या जिल्हाप्रमुखपदाची जवाबदारी सचिन मोहिते यांना देण्यात आली आहे.
त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा शिवसेनेच्या दोन गटांचा जिल्ह्यातच समांतर प्रवास सुरू झाल्याने आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकाच पक्षाच्या दोन गटांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. शिंदे गट सत्तेत सामील असल्यामुळे त्यांची बाजू कदाचित वरचढ होऊ शकते. पण जिल्ह्यातील मूळ शिवसैनिक कोणता कौल घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाटण तालुक्यात आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेच्या माध्यमातून मूळ शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्याला मंत्री देसाई यांनीसुद्धा भव्य शक्तिप्रदर्शन करून जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी आरोप- प्रत्यारोप झाले. मात्र, आगामी निवडणुकीत मूळ शिवसैनिकांची उणीव मंत्री देसाई गटाकडून कशी भरून काढली जाणार याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यात शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर त्याचे पडसाद पाटणच्या राजकारणात गेले दीड- दोन महिने पाहायला मिळत आहेत. मंत्री देसाई यांनी बंडखोरी केल्यानंतर तालुक्यात शिवसेनेला कोणी वाली नाही अशी हवा समर्थकांनी तयार केली होती.
मात्र, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांच्या जागी उद्धव ठाकरे यांनी माजी जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांची तातडीने नेमणूक करून पहिला राजकीय डाव टाकला. शंभूराज देसाई यांच्या शिफारशीने नेमणूक झालेल्या जयवंत शेलार यांना हटवून देसाईंना पहिला झटका दिला. हर्षद कदम यांनी तालुकाप्रमुख सुरेश पाटील, रवी पाटील या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आदित्य ठाकरे यांचा मेळावा यशस्वी केला. जिल्ह्यात ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटांचे जोरदार शक्तिप्रदर्शन सध्या सुरू आहे. कोरेगावात सध्या महेश शिंदे यांचा गट फार्मात असून त्यांना काटशह देण्याकरता महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदर शशिकांत शिंदे यांनाही जोरदार शक्तिप्रदर्शन करावे लागणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते म्हणून दिवाकर रावते, नितीन बानगुडे पाटील यांनाही कोरेगावात वेगळी रचना आखावी लागणार आहे.
पक्षाच्या वाटचालीकडे सर्वांचे लक्ष
दोन्ही गटाच्या जिल्हा कार्यकारिणी आता निश्चित झाल्या असून मूळ शिवसैनिक कोणत्या गटाचा आणि मूळ शिवसेना कोणाची हे राजकीय संदर्भ आता कायदेशीर तपासले जाणार आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेची वाटचाल कोणत्या गटाला धार्जिणी असणार याचे उत्तर मिळण्यासाठी वाट पाहवी लागणार आहे.





