Darshan Kumar : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाच्या दुःखातून सावरत असतानाच म्युझिक इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टी सिरीजशी संबंधित महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व दर्शन कुमार यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
दर्शन कुमार हे गुलशन कुमार यांचे भाऊ होते. 1983 मध्ये गुलशन कुमार यांनी स्थापन केलेली ‘सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज’ पुढे टी सिरीज या नावाने ओळखली जाऊ लागली आणि भारतीय संगीत क्षेत्रात क्रांती घडवून आणली.
गुलशन कुमार हे जसे सर्वपरिचित होते, तसे दर्शन कुमार मात्र कायम प्रसिद्धीपासून दूर राहिले. तरीही त्यांनी पडद्यामागे राहून मोठे योगदान दिले आणि अनेक गायक-संगीतकारांना संधी देत त्यांना पुढे आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
गुलशन कुमार यांनी स्थापन केलेल्या या कंपनीने पुढे जगातील सर्वात मोठ्या म्युझिक लेबल्सपैकी एक बनली. गुलशन कुमार यांचे 1997 मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ही परंपरा पुढे चालवली.
दर्शन कुमार यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, सोशल मीडियावर अनेकांकडून दुःख व्यक्त केले जात आहे. गायक मिक्का सिंग याने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
“दर्शन कुमार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांनी अनेक कलाकारांना संधी दिली आणि नेहमी मदतीसाठी पुढे असत. त्यांच्या आठवणी कायम राहतील.” अशा शब्दांत मिक्काने आपल्या भावनांना वाट मोकळी केली.
हेही वाचा : gold-silver price today: सोने -चांदी महाग झाले की स्वस्त? ; जाणून घ्या नवीन किमती काय?