पिंपरी | संत तुकाराम महाराजांच्या पालखीला नवीन छत्री

देहूगाव, (वार्ताहर)- श्री संत तुकाराम महाराजांच्या 339 व्या पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने नवी वेलवेटची छत्री बनविण्यात आली आहे. संस्थानसाठी ही छत्री पुण्यातील भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ व त्यांच्या मित्र मंडळींनी चेन्नई येथून तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास तयार करून घेतलेली आहे.
ही छत्री शनिवारी (दि. 22) राजेश भुजबळ व त्यांच्या सहकार्यांनी संस्थानकडे सुपूर्द केली. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, आकुर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त गुलाब कुटे, कीर्तनकार प्रितम महाराज मोरे, नामदेव गिराम चोपदार, धैर्य ठक्कर, सुभाष उरडीस विनोद जळगावकर उपस्थित होते.
राजेश भुजबळ यांनी संस्थानसाठी ही छत्री श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी चेन्नई येथील विशेष कारागिरांकडून तयार करून घेतली आहे. यासाठी वेलवेटचे कापड वापरण्यात आले आहे. या छत्रीवर हाताने संपूर्ण कारागिरी केलेली आहे.
यामुळे यंदा पालखीसोहळ्यात ही छत्री एक आगळे वेगळे लक्षवेधी ठरणार आहे. ही छत्री रंगीत व आगळी वेगळी सुरेख पद्धतीने तयार केलेली असून अब्दागिरी, गरूड टक्के, रेशमी ध्वज पताका यांच्या समवेत भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.
अशी आहे छत्री…
छत्रीवर शंख, चक्र, तिलक (गंध), गरूड, हनुमान यांची चित्र हातकामाने (हातमाग) केलेली आहे. इतर भागात सुरेख नक्षीकाम केलेले आहे.
छत्रीसाठी लागणार्या काड्या नैसर्गिक बांबूच्या चिमट्यांपासून बनविलेल्या आहेत. लोखंडी तारा बसविलेल्या नाहीत. छत्री पकडण्यासाठी आठ फूट उंचीचे एसएस लोखंडी भक्कम पाइपचा वापर करण्यात आला आहे. छत्रीच्या वर पितळी कळस बसविण्यात आला आहे.





