टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारताच गौतम गंभीरच्या ‘त्या’ 3 निर्णयाने नवीन वादाला सुरुवात

टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर टीम इंडिया आपल्याला अधिक आक्रमक पाहायला मिळू शकते. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि वन-डे मालिका गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका असणार आहे. गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारताच नवीन वाद निर्माण झाले आहेत. त्याने घेतलेल्या काही निर्णयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. चला तर मग जाणून घेऊयात हे निणर्य काय आहेत…
हार्दिक पांड्याचे कर्णधारपद
IPL 2024 मधील खराब कामगिरीमुळे हार्दिक पांड्याला खूप ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर हार्दिकने 2024 च्या टी-२० विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून त्याची निवड करण्यात आली आणि त्याने ही जबाबदारी पार पाडली. पण श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला कर्णधारपद देण्यात आले. हार्दिककडे अनुभव आहे, तो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तरीही त्याला कर्णधार न केल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. गौतम गंभीरच्या या निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे.
शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशा परिस्थितीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने झिम्बाब्वेचा मालिकेत 4-1 असा पराभव केला. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत शुभमन गिलला उपकर्णधारपद दिल्याने त्याची मोठया प्रमाणात चर्चा रंगली आहे. शुभमन गिलपेक्षा अनुभवी खेळाडू संघात असताना या निर्णयाने सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे.
ऋतुराज आणि अभिषेकला संघात स्थान नाही
ऋतुराज गायकवाडबद्दल बोलायचे झाले तर त्याला किमान टी-20 संघात स्थान द्यायला हवे होते, असं मत व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत त्याने टी-20 सामन्यांच्या 20 डावांमध्ये 39.5 च्या सरासरीने 633 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यावर असताना त्याने दोन वेगवेगळ्या क्रमाने फलंदाजी करत तीन डावात 133 धावा केल्या. जिथे खेळाडूंना फलंदाजी करण्यास अडथळा येत होता, तिथे गायकवाड सातत्याने चांगली फलंदाजी करत होता. मात्र असे असतानाही गायकवाडला संघात स्थानही देण्यात आलेले नाही. दुसरीकडे, अभिषेक शर्माने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला असला तरी दुसऱ्या सामन्यात त्याने 47 चेंडूत 100 धावा करत आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. अभिषेकने दाखवून दिले की तो अनुभव मिळवल्यानंतर आणखी चांगली कामगिरी करू शकतो. तरीही या दोघांना श्रीलंकेविरुद्धच्या संघात स्थान देण्यात न आल्याने सगळे आश्चर्यचकित झाले आहेत.





