Pimpri : वेणगाव येथे नानासाहेब पेशवे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणार

कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्यात अनेक रत्ने जन्माला आली. त्यामध्ये हुतात्मा हिराजी पाटील, हुतात्मा भाई कोतवाल व वेणगाव येथे जन्मलेले थोर स्वातंत्र्य सेनानी नानासाहेब पेशवे हे आहेत. १८५७ च्या उठावामध्ये नानासाहेब पेशवे यांचे मोलाचे योगदान होते.
जर हा उठाव यशस्वी झाला असता तर भारताला तेव्हाच स्वातंत्र्य मिळाले असते. नानासाहेब पेशवे हे या भूमीचे सुपुत्र असल्याचा आम्हा कर्जतकरांना अभिमान आहे. नानासाहेब पेशवे यांचे राष्ट्रीय स्मारक वेणगाव या ठिकाणी उभारले जाईल आणि त्यासाठी आवश्यक असलेला खर्च राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा शब्द आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला.
१८५७ च्या उठावातील स्वातंत्र्य सेनानी नानासाहेब पेशवे यांच्या २००व्या जयंती निमित्त त्यांच्या जन्मगावी वेणगाव (ता. कर्जत) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी थोरवे बोलत होते. पुढे बोलताना राष्ट्रीय स्मारकासाठी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून ३ ते ५ एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, असेही थोरवे यांनी जाहीर केले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच यावेळी माजी आमदार सुरेश लाड, भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, नानासाहेब पेशवे द्विशताब्दी जयंती सोहळ्याचे उपाध्यक्ष भाई गायकर, रमेश मुंढे, नितीन कांदळगावकर, सुधीर थोरात, राजेश भगत उपस्थित होते.





