Aruna Irani : पतीच्या निधनानंतर महिनाभराने अरुणा इराणी यांनी शेअर केला भावूक व्हिडिओ; म्हणाल्या…
Aruna Irani : पतीच्या निधनानंतर महिनाभराने अरुणा इराणी यांनी सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Aruna Irani : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यावर पती कुकू कोहली यांच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला. २५ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात वयाच्या ७७ व्या वर्षी कुकू कोहली यांनी अखेरचा श्वास घेतला.
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कुकू कोहली हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-निर्माते होते.
पतीच्या निधनानंतर महिनाभराने अरुणा इराणी यांनी सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
चाहत्यांच्या प्रेमाने दिला दुःखातून सावरण्याचा आधार
पतीच्या निधनानंतर अरुणा इराणी यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रविवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्या भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. या कठीण काळात चाहत्यांनी दिलेले प्रेम, आपुलकी आणि पाठिंबा याबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.
अरुणा इराणी म्हणाल्या, “कुकूजींच्या निधनानंतर तुम्ही सर्वांनी मला दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल मी मनापासून आभारी आहे. या प्रेमाने मला कठीण काळातून सावरण्याची शक्ती दिली आहे.”
चाहत्यांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे या दुःखातून बाहेर पडण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पुन्हा कामावर परतण्याची ताकद आपल्याला या प्रेमातून मिळाल्याचे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केली.
View this post on Instagram
चाहत्यांना केले खास आवाहन
या व्हिडिओच्या माध्यमातून अरुणा इराणी यांनी चाहत्यांना भावनिक साद घातली. आयुष्यातील कठीण प्रसंगात आपल्या पाठीशी उभे राहिलेल्या चाहत्यांचे प्रेम आणि पाठबळ त्यांच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही चाहत्यांनी आपल्यावर असेच प्रेम करावे आणि पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
अरुणा इराणी यांच्या या व्हिडिओवर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांसह चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी त्यांना धीर देत अनेकांनी खंबीर राहण्याचे आवाहन केले.
प्रदीर्घ कारकीर्द, अनेक अविस्मरणीय भूमिका
अरुणा इराणी यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत हिंदी चित्रपटसृष्टीसह टेलिव्हिजन विश्वातही उल्लेखनीय काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
पतीच्या निधनामुळे वैयक्तिक आयुष्यात मोठा धक्का बसलेला असतानाही चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे त्या पुन्हा कामाकडे वळत असल्याचे त्यांच्या व्हिडिओतून दिसून येते. त्या आगामी काळात कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.






