धक्कादायक! शिक्षकाकडे तक्रार केल्याच्या रागातून अल्पवयीन विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला

लोणंद – खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर त्यांच्याच शाळेतील पंधरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकांना तक्रार केल्याच्या रागातून कोयत्याने जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले.
शिरवळ येथील एका खासगी शाळेत शिकत असलेले चौदा आणि पंधरा वर्षीय दोन सख्ख्या भावंडांवर त्यांच्याच शाळेत शिकणाऱ्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने शाळा सुटल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोयत्याच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. जखमी विद्यार्थ्यांपैकी चौदा वर्षीय विद्यार्थ्याला अधिकच्या उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे तर पंधरा वर्षीय विद्यार्थ्यावर शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सतीश आन्देलवार, अब्दुल बिद्री, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, दत्तात्रय धायगुडे, तुषार अभंग, सुजित मिंगावडे, भाऊसाहेब दिघे, दिपक पालेपवाड, संजय थोरवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरवळ पोलीसांनी रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांकडून हल्लेखोर विद्यार्थ्याची माहीती घेवून अवघ्या वीस मिनिटात हल्लेखोर संशयीतास ताब्यात घेतले. सदर घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत करण्याचे काम सुरू होते.





