अल्पवयीन मुलाने अनेकांना भोसकले; दोघांचा मृत्यू तर 9 जण जखमी

लंडन – ब्रिटनमध्ये अनेकांना भोसकल्याच्या संशयावरून १७ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस या हल्ल्यामागील हेतूबाबत या मुलाकडे चौकशी करत आहेत. इंग्लंडच्या नैऋत्येकडील भागातल्या मुलांच्या डान्स वर्कशॉपमध्ये हा हल्ला झाला. या चाकू हल्ल्यामध्ये किमान दोन लहान मुले मरण पावली आहेत. तर अन्य ९ मुलांना चाकूच्या वाराच्या जखमा झाल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले. मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोन प्रौढ व्यक्तीही जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चाकूचे वार झालेली सर्व मुले ६ ते ११ वर्षे वयोगटातील आहेत. ही सर्व मुले उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त डान्सच्या वर्कशॉपला उपस्थित राहिली होती. या हल्ल्याचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे या हल्ल्याला दहशतवादी हल्ला संबोधले जाणार नाही. या हल्ल्यामध्ये अन्य कोणाचाही हात असल्याचा संशय नाही.
हल्ला करणारा संशयित १७ वर्षांचा असून तो लँकशायरच्या किनारी भागात रहात होता. तो हातात चाकू घेऊन वर्कशॉपमध्ये घुसला आणि त्याने एकापाठोपाठ एक करत मुलांवर वार करायला सुरुवात केली होती. ब्रिटनचे राजे चार्ल्स, राणी कॅमिला आणि राजपुत्र आणि राजकन्येने देखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशाला तीव्र धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी दिली आहे.





