पिंपरी | कासारसाई-कुसगाव धरणात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू

सोमाटणे, (वार्ताहर) – कासारसाई-कुसगाव धरण येथे बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, शिरगांव-परंदवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी समाधान फडतडे यांनी वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांना फोन करून कळविले की, कासारसाई-कुसगाव धरण येथे एकजण बुडाला आहे. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन्यजीव रक्षकचे सदस्य तत्काळ घटनास्थळी गेले. अथक प्रयत्नांनी त्यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महाविद्यालयात शिकणारे पाच विद्यार्थी मित्रांचा ग्रुप कासारसाई धरण येथे फिरण्यासाठी आला होता. ही मुले धरणाच्या पाण्यात जलविहारासाठी उतरली. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यातील एकजण पाण्यात बुडाला.
वन्यजीव रक्षक संस्थेचे सदस्य यांना बोलवण्यात आले, त्यांनी शोध घेऊन मुलाचा मृतेदह पाण्याबाहेर काढला. १७ वर्षीय हा मुलगा थेरगाव येथील रहिवासी होता. प्रकरणाचा पुढील तपास शिरगाव-परंदवडी पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी समाधान फडतडे देशमुख यांनी दिली.





