पुणे जिल्हा | एमआयटीच्या विद्यार्थ्यांकडून नशामुक्तीचा संदेश

लोणी काळभोर, (वार्ताहर) – गेल्या काही दिवसांत शिक्षणाचे माहेरघर असणार्या पुण्यात युवकांकडून अमली पदार्थांचे सेवन वाढल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना अमली पदार्थ्यांच्या सेवनापासून दूर ठेवण्यासाठी व त्यांचे मन ट्रेकसारख्या साहसी क्रीडा प्रकारांकडे वळविण्यासाठी एमआयटी विद्यापीठ प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या उपक्रमातून सर्व विद्यार्थ्यांना ट्रेकिंगसारखे छंद जोपासण्यास प्रोत्साहन देत आहोत, अशी माहिती विद्यार्थी कल्याण विभागाचे सहायक संचालक डॉ. सुराज भोयार यांनी व्यक्त केले.
येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग, अॅडव्हेंचर क्लब आणि काफीला अॅडव्हेंचर्स या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या ’नशा मुक्त भारत’ अभियानासाठी (एनएमबीए) सुप्रसिद्ध देवकुंड धबधबा नजिक असणार्या भिरा गावात एकदिवसीय ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षणाचे माहेरघर असणार्या पुण्यातील तरुणाईने मादक द्रव्यांचे सेवन न करता वन पर्यटनाच्या माध्यमातून शारिरीक व मानसिक आरोग्य अबाधित राखले पाहिजे असा संदेश देण्याचा उद्देश या ट्रेकच्या आयोजनामागे होता. या ट्रेकमध्ये विद्यापीठाच्या 80 विद्यार्थ्यांनी सहभागी होत केवळ वनविहार न करता भिरा गावातील ट्रेकिंग मार्गावर पडलेला कचरा गोळा करत पर्यावरण संवर्धनाचा देखील संदेश दिला.




