International Flying Festival : फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी
International Flying Festival : महापालिकेचे माजी पर्यावरण अधिकारी मंगेश दिघेंचे कुपे कार फेस्टिव्हलमध्ये पॅराग्लायडिंग

पुणे : फ्रान्समधील कुपे कार २०२६ या आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये पुण्याचे पॅराग्लायडिंग पायलट आणि पुणे महापालिकेचे माजी पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी मराठी शेतकऱ्याच्या पारंपरिक वेशभूषेत पॅराग्लायडिंगचे उड्डाण करून महाराष्ट्राची वेगळी ओळख आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचविली.
फ्रान्समधील ग्रेनोबल शहराजवळील सेंट हिलारे डोंगरावर १९७९ पासून दरवर्षी सप्टेंबरमध्ये हा फ्लाईंग फेस्टिव्हल आयोजित केला जातो. यंदाच्या ५३ व्या महोत्सवात विविध देशांतील पायलट सहभागी झाले आहेत. हजारो फ्रेंच नागरिक आणि विविध देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत दिघे यांनी अल्प्स पर्वतरांगांवरून मराठी शेतकऱ्याच्या वेशात उड्डाण केले. त्यांच्या या अनोख्या उड्डाणाचे उपस्थितांनी कौतुक केले.
सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विमानांचे एरोबॅटिक्स, हेलिकॉप्टर, गायरोकोप्टर, हँग ग्लायडर, पॅराग्लायडर, पॅरामोटर, एरोमॉडेलिंग आणि हॉट एअर बलून यांची प्रात्यक्षिके सादर केली जातात. विविध कंपन्यांची प्रदर्शनेही या महोत्सवात भरविली जातात.
दिघे यांनी उड्डाणासाठी धोतर, झब्बा आणि डोक्यावर मराठी फेटा अशी वेशभूषा केली होती. पॅराग्लायडिंगच्या तांत्रिक बाबींमध्ये किंवा सुरक्षाव्यवस्थेत कोणताही बदल न करता ही वेशभूषा करण्यात आली. हार्नेसच्या आत आणि बाहेर केलेली वेशभूषा तसेच हेल्मेटवर बांधलेला मराठी फेटा यामुळे त्यांच्या उड्डाणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. पर्यावरण क्षेत्रात काम केल्यानंतर साहसी क्रीडा क्षेत्रातही सक्रिय असलेल्या दिघे यांच्या या उपक्रमातून मराठी संस्कृतीची ओळख अल्प्सच्या आकाशात पोहोचली.
हेही वाचा:





