पिंपरी | माणसाला एक तरी कला अवगत असावी

तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी माणसाला एक तरी कला अवगत असावी लागते. प्रत्येकाने कला जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांनी व्यक्त केले.
जिल्हास्तरीय कलाशिक्षक कृती सत्रात त्या बोलत होत्या. या कार्यशाळेचे उद्घाटन शरद गोसावी, अमित विक्रम, बिपिन शर्मा, जयप्रकाश कलवले, संघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेलार, सचिव वाहीद खान व उपाध्यक्ष किरण सरोदे यांच्या उपस्थितीत झाले.
या वेळी कलाभूषण परस्काराने नयना आपटे. कला महर्षी पुरस्काराने खान हुसेन गाजेखान, सुंदराबाई संपतराव शेलार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कलाश्री पुरस्काराने मोहन भोजापुरे, कलागौरव पुरस्काराने चंद्रकांत जोशी आणि शंकरराव घोरपडे यांना सन्मानित करण्यात आले.
३० कलाशिक्षकांना पुरस्कार प्रदान
या वेळी नवीन शैक्षणिक धोरणात कलाशिक्षकांची स्थान या विषयावर मोहन भोजापुरे यांचे व्याख्यान झाले. या वेळी मिलिंद सिंपी यांनी स्प्रे पेंटिंगच्या माध्यमातून पोट्रेट काढण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.
या वेळी कलाशिक्षक संघाचे बुलेटिन प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील ३० कला शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, प्राचार्य जयप्रकाश कलवले, जिल्हाध्यक्ष मिलिंद शेलार, उपाध्यक्ष किरण सरोदे यांच्या हस्ते या गुणवंत कलाशिक्षकांना पुरस्कार देण्यात आला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मिलिंद शेलार यांनी केले.





