राज्याच्या मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल; नाना पटोलेंनी दिले राजकीय भूकंपाचे संकेत

भंडारा, दि. 16 – महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. राज्यातील मंत्रिमंडळात 10 मार्चनंतर खांदेपालट करण्यात येईल, असे संकेत कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे आरोप केले होते. त्याच पार्श्वभूमीवर पटोलेंच्या या नवीन दाव्याने राजकीय वर्तुळामध्ये नवीन चर्चांना उधाण आले आहे.
भंडारा येथे एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे संकेत दिले आहेत. नाना पटोले म्हणाले, पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 10 मार्चनंतर बदल होणार आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. ही वेळ दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. लवकरच राज्य सरकारमध्ये बदल दिसतील. सध्या राज्यात जे काही सगळे सुरु आहे, ते लवकरच दुरुस्त करायचे आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस हा सर्वात छोटा पक्ष आहे. यामुळे आता पटोले यांच्या या दाव्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेतात हे येत्या काळामध्ये उघड होईल. येत्या 10 मार्चला पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर राज्यात जवळपास 13 पालिकांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळात बदल होणार का, याची उत्सुकता आहे.





