NCP Sharad Pawar : डिलिमिटेशननंतर मोठा राजकीय भूकंप? सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद? दोन बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा
NCP Sharad Pawar : . मात्र, विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीएला इतर पक्षांच्या खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असून राजकीय पक्षांमध्ये पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे.

NCP Sharad Pawar : देशाच्या राजकारणात सध्या लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकावरून मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली असून, ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार आहे. मात्र, विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीएला इतर पक्षांच्या खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असून राजकीय पक्षांमध्ये पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे.
याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते, अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे. एवढेच नव्हे, तर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनाही राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडून एनडीएमध्ये सहभागी होणार का, याबाबतही तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, यासंदर्भात पडद्यामागे चर्चा सुरू असून सत्तेतील वाट्याबाबतही हालचाली होत असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे राज्यात सध्या केवळ १० आमदार आहेत. दुसरीकडे, डिलिमिटेशन विधेयकातील प्रस्तावानुसार लोकसभेच्या एकूण जागांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा विचार आहे.
नव्या रचनेत राज्यांचे लोकसभेतील सध्याचे प्रतिनिधित्वाचे प्रमाण कायम ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. या प्रस्तावानुसार लोकसभेची सदस्यसंख्या सध्याच्या ५४३ वरून वाढून ८५० पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयकावर काय निर्णय होतो आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नेमकी कोणती भूमिका घेते, यावर देशासह महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे अवलंबून असतील. त्यामुळे या घडामोडींकडे देशासह राज्याचे लक्ष लागले आहे.





