Mahela Jayawardene : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! महेला जयवर्धनेने मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा; नीता अंबानींची भावूक पोस्ट
Mahela Jayawardene : नीता अंबानी यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी महेला जयवर्धनेच्या योगदानाचे कौतुक करत तो कायमच मुंबई इंडियन्सच्या ‘वन फॅमिली’चा भाग राहील, अशी भावना व्यक्त केली.

Mahela Jayawardene : आयपीएलमधील लोकप्रिय संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्समध्ये मोठी घडामोड समोर आली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या पुढील वाटचालीबाबत आणि संघाच्या नेतृत्वातील संभाव्य बदलांबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, जयवर्धने यांनी राजीनामा नेमक्या कोणत्या कारणामुळे दिला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी महेला जयवर्धनेच्या योगदानाचे कौतुक करत तो कायमच मुंबई इंडियन्सच्या ‘वन फॅमिली’चा भाग राहील, अशी भावना व्यक्त केली.
नीता अंबानींची भावूक पोस्ट; महेलाच्या योगदानाचे कौतुक
नीता अंबानी यांनी आपल्या पोस्टमध्ये महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्ससाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, महेलाने गेल्या काही वर्षांत संघासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्याच्या नेतृत्वाबद्दल आणि संघाप्रती असलेल्या समर्पणाबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच महेलासोबतच्या प्रवासात निर्माण झालेल्या आठवणी नेहमीच जपून ठेवल्या जातील आणि तो कायमच मुंबई इंडियन्सच्या ‘वन फॅमिली’चा भाग राहील, असेही त्यांनी नमूद केले.
जयवर्धनेने मानले खेळाडू आणि व्यवस्थापनाचे आभार
मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर महेला जयवर्धनेनेही मुंबई इंडियन्ससोबतच्या प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. त्याने संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांचे आभार मानले. तसेच नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांनी दाखवलेला विश्वास, दिलेला पाठिंबा आणि जपलेले संबंध हे आपल्या प्रवासातील महत्त्वाचे भाग असल्याचे सांगितले.
View this post on Instagram
मुंबई इंडियन्सच्या यशात महेलाची महत्त्वाची भूमिका
महेला जयवर्धनेने २०१७ मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. २०२२ पर्यंत तो या पदावर कार्यरत होता. त्यानंतर २०२२ मध्ये त्याच्याकडे मुंबई इंडियन्सच्या जागतिक कामगिरी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०२४ मध्ये त्याची पुन्हा संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये तीन वेळा विजेतेपद पटकावले. त्यामुळे संघाच्या यशस्वी वाटचालीत जयवर्धनेचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. महेला जयवर्धनेच्या राजीनाम्यानंतर त्याच्या जागी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





